IND vs ENG 3rd Test: अरे पळ, घे चेंडू खाली ठेवतो...! रवींद्र जडेजाने दिलेली खुली ऑफर, पण जो रूट निघाला 'शहाणा'; Video Viral
esakal July 11, 2025 06:45 AM

England vs India, 3rd Test at Lord's, London: यजमान इंग्लंडने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ बाद २५१ धावांपर्यंत मजल मारली. अनुभवी फलंदाज जो रूट ( Joe Root) याने भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना केला आणि दिवसअखेर ९९ धावांवर नाबाद राहिला. कर्णधार बेन स्टोक्स व ऑली पोप यांनी त्याला चांगली साथ दिली. दरम्यान, दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर मजेशीर प्रसंग पाहायला मिळाला.

बेन डकेट ( २३) व झॅक क्रॉली ( १८) यांना नितीशने १४ व्या षटकात चार चेंडूंच्या अंतराने माघारी पाठवले. २ बाद ४४ धावांवरून इंग्लंडला रूट व ऑली पोप या जोडीने सावरले. या दोघांनी २११ चेंडूंत १०९ धावा जोडल्या. पोप १०४ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ४४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर हॅरी ब्रूकला ( ११) जसप्रीत बुमराहने भन्नाट चेंडूवर त्रिफळाचीत केले.

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजने बॉल फेकून मारलाच होता, जो रूटवर खवळला; नेमकं काय घडलं?

मात्र, रूट मैदानावर शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने लॉर्ड्सवर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रमही आज नावावर केला. त्याने ( २५१५) ग्रॅहम गूच ( २५१३) यांचा विक्रम मोडला. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या ४ बाद २५१ धावा झाल्या होत्या. जो रूट १९१ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने ९९ धावांवर नाबाद आहे, तर बेन स्टोक्सनेही १०२ चेंडूंत ३९ धावांची नाबाद खेळी केली आहे.

दरम्यान, ८१ वे षटक संपले तेव्हा जो रूट ९३ धावांवर होता आणि दिवसाच्या शेवटच्या षटकात त्याला जसप्रीत बुमराहचा सामना करायचा होता. त्याने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या, नंतर एक धाव घेतली. ८२व्या षटकानंतर रूटची धावसंख्या ९६ झाली आणि तो शेवटच्या षटकात शतक पूर्ण करेल असेच वाटले होते. आकाश दीपने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर रुटने २ धाव घेतल्या आणि तो ९८ धावांपर्यंत पोहोचला. चौथा चेंडू रूटने पॉईंटच्या दिशेने मारला, तिथे जडेजा क्षेत्ररक्षण करत होता.

IND vs ENG 3rd Test: कंटाळवाण्या कसोटीत तुमचं स्वागत! शुभमन गिल अन् मोहम्मद सिराज ऑन फायर, स्लेजिंगचा मजेशीर Video Viral

रूटने वेगाने एक धाव पूर्ण केली आणि तो दुसऱ्या धावेसाठी पळतच होता. तेव्हा जड्डूने त्याला पळण्याचा इशारा केला आणि त्याने चेंडूही जमिनीवर ठेवला. रूटने सुरुवातीला पळण्याची तयारी दाखवली, पंरतु बेन स्टोक्सने नकार दिला आणि रूट माघारी परतला. पण, जडेजाच्या मस्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

यापूर्वी २०१४ मध्ये जो रूट दिवसाचा खेळ संपला तेव्हा ९४ धावांवर नाबाद राहिला होता आणि तो सामना भारताविरुद्धचाच होता. ओव्हलमध्ये झालेल्या त्या सामन्यात रूटने दुसऱ्या दिवशी नाबाद १४९ धावा केल्या. आजच्या कसोटीत रूट ९९ धावांवर नाबाद आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.