पंढरपूरच्या वारीहून नातवाला भेटायला आले, आजोबांना तिथे काळाने गाठले, 7 वर्षांचा नातू…
Tv9 Marathi July 11, 2025 03:45 PM

आषाढी एकादशी नुकतीच झाली. सालाबादप्रमाणे लाखो भक्तांनी वारी करत, पंढरपूर गाठत विठूरायाचे दर्शन घेतले, लोटांगण घातले आणि आपल्या लाडक्या देवाचं रुप डोळ्यांत साठवून पुन्हा घरचा मार्ग धरला. मात्र त्यापैकीच एका भक्ताला वारीनंतर काळाने गाठल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पंढरपूरची वारी आटोपल्यानंतर आपल्या लाडक्या नातवाला भेटण्यासाठी आलेल्या 60 वर्षांच्या आजोबांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचा 7 वर्षांचा नातूदेखील गंभीर जखमी झाला आहे. वसईत झालेल्या या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसई सनसिटी ते गास रोडवर बुधवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास हा भयानक आणि दुर्दैवी अपघात झाला. चंद्रकांत खाखम (वय 60) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या आजोबांचे नाव आहे तर ध्रुव सिंह ( वय 7) असे जखमी नातवाचे नाव आहे. मृत चंद्रकांत हे नुकतचे पंढरपूरची यात्रा आटोपून परत आले होते. वारीनंतर ते वसईत परत आले, आणि त्यानंतर ते आजोबा ॲक्टिव्हावरून आपल्या नातवाला जवळच्या बागेत फिरायला घेऊन जात होते. मात्र तेव्हाच हा अपघात झाला. दुसऱ्या बाईकरून वेगाने आलेल्या इसमाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली आणि चंद्रकांत व त्यांचा नातू खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण आजोबा चंद्रकांत यांचा मृत्यू झाला तर नातू गंभीर जखमी आहे.

अपघाताला कारणीभूत ठरलेला हा दुचाकीस्वार मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता असा संशय व्यक्त केला जात असून, तो दुचाकीस्वार व त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीलाही मार लागल्याने त्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, याचा आम्ही तपास करीत असल्याची माहिती नालासोपारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास वळवी यांनी दिली आहे.

मुंबई नाशिक महामार्गावर कानिफनाथ मंदिरासमोर भीषण अपघात, एक ठार

मुंबई नाशिक महामार्गावर कानिफनाथ मंदिरासमोर भीषण अपघात घडला आहे. रस्त्यावर पुढे धावणाऱ्या आयशर गाडीवर पाठीमागून भरधाव वेगाने येणरी मोटरसायकल आदळली. नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल जोरात जाऊन आदळली आणि हा अपघात झाल्याचे समजते. या भयानक अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीस पुढील उपचारासाठी महामार्ग पोलिस केंद्र घोटीच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

गाडीची वाट पाहत असलेल्या आजीला SUV चालकाने चिरडलं

माटुंग्यात एका 73वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाला आहे. इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ गाडीची वाट पाहत असलेल्या आजीला एका SUV चालकाने चिरडले. चालक हा गाडी पार्क करत होता, तेव्हा चुकून त्याचा पाय एक्सेलरेटरवर गेल्याने नियंत्रण सुटले म्हणून हा अपघात झाल्याचे पोलिसांना सांगितले. माटुंगा पोलिसांनी या प्रकरणी बेपर्वाईने वाहन चालवून मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चालक मनोहर ताडुक हा नेरुळचे रहिवासी असून ते पीडित जयाबेन पारख यांच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला भेटायला आले होते. जयाबेन पारख या त्यांच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. काही वेळातच त्यांच्या कुटुंबाला अपघाताची माहिती देण्यात आली. SUVच्या पुढच्या चाकांखाली अडकून गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तत्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.