इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने पहिल्या दिवसापर्यंत 4 विकेट्स गमावून 83 ओव्हरमध्ये 251 रन्स केल्या. बेन स्टोक्स आणि जो रुट ही जोडी नाबाद परतली. तर टीम इंडियासाठी नितीश कुमार रेड्डी याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. या दरम्यान उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला बोटाला झालेल्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं होतं. त्यामुळे पंतच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल याने विकेटकीपिंगची जबाबदारी घेतली. त्यानंतर आता बीसीसीआयने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी पंतबाबत मोठी अपडेट दिली आहे.
“ऋषभ पंत डाव्या हाताच्या तर्जनीला झालेल्या दुखापतीतून अजूनही बरा होत आहे. पंतवर बीसीसीआयचं वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. ध्रुव जुरेल दुसऱ्या दिवशीही विकेटकीपिंग करत राहील”, अशी माहिती बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.
पंतला पहिल्या दिवशी बहुतांश खेळाला मुकावं लागलं. तर दुसऱ्या दिवशीही पंत मैदानाबाहेर असणार आहे. त्यामुळे पंत दुखापतीतून बरा झाला नाही तर त्याला तिसऱ्या सामन्याला मुकावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तसं काही होऊ नये, अशी प्रार्थना क्रिकेट चाहत्यांची असणार आहे. त्यामुळे पंतच्या दुखापतीबाबत बीसीसीआय पुढील अपडेट काय देतं? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ध्रुव जुरेलकडे विकेटकीपिंगची जबाबदारी
पंतला पहिल्या दिवशी 34 व्या ओव्हरदरम्यान ही दुखापत झाली. जसप्रीत बुमराह इंग्लंडच्या डावातील 34 वी ओव्हर टाकत होता. पंतने बुमराहने टाकलेला बॉल अडवण्यासाठी डाईव्ह मारली. पंत बॉल अडवण्यात अपयशी ठरला. पंतच्या तर्जनीला बॉल लागून गेला. त्यामुळे पंतला दुखापत झाली. त्यानंतर पंतवर आवश्यक प्रथमोपचार करण्यात आले. पंतने यानंतर या ओव्हरमध्ये विकेटकीपिंग केली. त्यानंतर पंतने मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर ध्रुव विकेटकीपिंग करत आहे.
दरम्यान ऋषभ पंत याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधील 4 डावांत 85.50 च्या सरासरीने आणि 81.81 या स्ट्राईक रेटने एकूण 342 धावा केल्या आहेत. पंतने या दरम्यान 2 शतकं आणि 1 अर्धशतक झळकावलं आहे.