मंत्री संजय शिरसाट हे अडचणीत सापडले आहेत, त्यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. या नोटीशीनंतर शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडीओ समोर आणला आहे. यात संजय शिरसाट यांच्या घरात असलेल्या बॅगेत नोटांचे बंडल पाहायला मिळत आहे. यावर आता आमदार आदित्य ठाकरेंनीही भाष्य केले आहे. ते काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
संजय शिरसाट यांच्या व्हिडिओवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, ‘आम्ही गेले दोन अडीच वर्षे 50 खोके एकदम ओक्के बोलत आहोत, त्यातील एक खोका आज दिसला. एक आमदार मारामारी करत आहे, आज एक आमदार खोक्यासमोर बसलेला दिसला. बॅगमध्ये काय आहे याबाबत ते बदलून बदलून सांगतील, महात्मा गांधींचा फोटो असलेला बनियान होता, बाकी त्यात काही नव्हतं असं ते सांगतील.’
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘ते मंत्री आहेत, त्यांच्यावर आधीही आरोप झाले आहेत, हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप त्यांच्यावर झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशीही लावली आहे. आता प्रश्न हाच आहे की, या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे यांच्यावर कारवाई करणार का?’
व्हिडीओत नेमकं काय?
या व्हिडीओत संजय शिरसाट हे आपल्या बेडरूममध्ये बसलेले आहेत. त्यांच्या बाजूला एका बॅगेत नोटांचे बंडल स्पष्टपणे दिसत आहेत. या व्हिडीओत संजय शिरसाट हे सिगारेट पिताना आणि फोनवर बोलतानाही दिसत आहेत. त्यासोबतच या व्हिडीओत त्यांचा पाळीव कुत्राही फिरताना दिसत आहे. सध्या संजय शिरसाट यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
खासदार संजय राऊत यांनी या व्हिडीओवरुन शिंदे गटावर टीका केली आहे. आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला होता. माझ्याकडे असलेल्या व्हिडीओत संबंधित मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसलेत हे दिसत आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले होते. या व्हिडीओमुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच यामुळे शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.