Eknath Shinde Shivsena : एखादा पक्ष सत्तेत असला की आपसूकच त्या पक्षाकडे सत्तेची ताकद येते. त्याचा फायदा पक्षाला तसेच पक्षातील राजकीय नेत्यांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होतच असतो. याचे काही ऐतिहासिक दाखलेही आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक नेत्यांनी सत्तेत असणाऱ्या पक्षात उड्या मारलेल्या आहेत. यातील बऱ्याच नेत्यांवरील आरोपांच्या आणि चौकशीचा ससेमिरा गायब झालेला आहे, असा दावा विरोधकांकडून केला जातो. सध्या मात्र राज्याच्या राजकारणात काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. सत्तेत असूनही शिवसेना (शिंदे गट) पक्षांच्या मागे वेगवेगळे शुक्लकाष्ठ लागलेले आहे. सत्तेत असूनही शिंदे गटाचे तीन नेते सध्या वेगवेगळ्या मार्गाने अडचणीत सापडले आहेत. त्यामुळेच आता महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? असं विचारलं जातंय.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे. 2019 ते 2025 या काळात वाढलेल्या संपत्तीचे स्पष्टीकरण द्यावे, असे या नोटीशीत म्हणण्यात आले आहे. याबाबत खुद्द शिरसाट यांनीही सांगितलं होतं. त्यानंतर शिरसाट यांच्याच विधानाचा आधार घेत शिंदे गटाचेच नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनाही प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचे सांगितले जात होते. या वृत्ताचे मात्र श्रीकांत शिंदे यांनी खंडन केलेले आहे. मला कोणतीही नोटीस आलेली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तडकाफडकी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. या सर्व घडामोडींनंतर शिंदे गटाचे नेते टार्गेटवर आहेत का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
दुसरीकडे शिरसाट यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते पलंगावर बसलेले असून त्यांच्यापुढे पैशांनी भरलेली एक बॅग दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून एवढे सारे पैसे आले तरी कुठून? असा प्रश्न विचारला जातोय. या व्हिडीओमुळेही शिरसाट चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या व्हिडीओमुळे शिरसाट यांची एका प्रकारे अडचणच झाली आहे.
शिंदे गटाचेच नेते तथा आमदार संजय गायकवाड हेदेखील अडचणीत सापडले आहेत. त्यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. या व्हिडीओत संजय गायकवाड कर्मचाऱ्याला रागात मारताना दिसत आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. मी कारवाईला घाबरत नाही, असं त्यांनी सांगितलं असलं तरी संजय गायकवाड एका प्रकारे अडचणीतच आले आहेत.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत खासदार संजय राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासारख्या विरोधी बाकावर असलेल्या अनेक नेत्यांना वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांच्या चौकशीला सामोरे जावे लागले. आता सत्तेत असूनही शिंदे गटाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? असा सवाल विचारला उपस्थित केला जातोय.