अंडी हे एक असे खाद्यपदार्थ आहे जे सहज उपलब्ध असते, स्वस्त असते, प्रथिनांनी भरलेलं असते आणि झटपट तयार होणारे देखील असते. त्यामुळेच अनेक लोक नाश्त्यात किंवा मुख्य जेवणात अंड्याचा समावेश करतात. विशेषतः व्यायाम करणारे, वजन वाढवू पाहणारे किंवा प्रतिकारशक्ती वाढवू इच्छिणारे लोक दररोज अंडी खाण्याकडे वळतात. पण यासोबतच अनेकांच्या मनात एक शंका कायम असते रोज अंडी खाणं आरोग्यासाठी खरंच योग्य आहे का? (should we eat eggs daily health benefits myths)
अंड्यांमध्ये काय पोषणमूल्य असतं?
अंडं हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत मानलं जातं. त्यात व्हिटॅमिन D, B12, A, आणि E यांसारखी अनेक जीवनसत्त्वं असतात. यामध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या लोह, झिंक आणि सेलेनियमसारख्या खनिजांचाही समावेश असतो. अंड्याच्या पिवळ्या भागात ‘कोलीन’ नावाचं एक अत्यंत महत्त्वाचं पोषणतत्त्व असतं, जे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त असतं. याशिवाय अंड्यात ल्यूटिन आणि झेक्झॅन्थीनसारखे अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
कोलेस्टेरॉलची भीती ?
अंड्याच्या पिवळ्या भागात मोठ्या प्रमाणात कोलेस्टेरॉल असतो, म्हणूनच अनेक लोक त्याचे सेवन टाळतात. एका मध्यम आकाराच्या अंड्यात सुमारे 185 मिग्रॅ कोलेस्टेरॉल असतो, जो काही काळापूर्वी अमेरिकेच्या आहार मार्गदर्शकानुसार ठरवलेल्या मर्यादेच्या जवळजवळ अर्धा असतो. त्यामुळे पूर्वी अंड्यांना हृदयविकाराचा धोका वाढवणारे मानले जात होते.मात्र अलीकडच्या संशोधनात असं आढळलं की, आहारातून घेतलेल्या कोलेस्टेरॉलचा शरीरावर फारसा परिणाम होत नाही. कारण आपलं शरीर स्वतः आवश्यक कोलेस्टेरॉल तयार करतं आणि आहारातून येणाऱ्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण संतुलित करतं. याशिवाय अंड्यात असणारे अँटीऑक्सिडंट्स कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडायझेशन होऊ देत नाहीत, जे हृदयासाठी अधिक घातक ठरतं. त्यामुळे अंड्याचं नियमित, नियंत्रित प्रमाणात सेवन बहुतांश लोकांसाठी सुरक्षित मानलं जातं.
रोज किती अंडी खाल्ली पाहिजेत?
सामान्य निरोगी व्यक्तीने दररोज एक ते दोन अंडी खाल्ली तरी काही धोका नाही. व्यायाम करणाऱ्यांना किंवा स्नायू वाढवणाऱ्या लोकांना दोन ते तीन अंडीदेखील उपयुक्त ठरू शकतात. मात्र, हृदयरोग, मधुमेह किंवा कोलेस्टेरॉलची पातळी आधीच जास्त असणाऱ्यांनी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच अंड्याचं सेवन करावं. योग्य प्रमाणात, उकडलेल्या किंवा शिजवलेल्या स्वरूपात अंडं खाल्ल्यास शरीराला पोषण मिळतं आणि अपाय होण्याची शक्यता कमी राहते.
अंड्याबाबत असलेले गैरसमज
अंडं खाल्लं की कोलेस्टेरॉल वाढतो, असा समज अनेक लोकांमध्ये आहे. पण अंड्यातील कोलेस्टेरॉल शरीरासाठी पूर्णपणे अपायकारक नसतो. याउलट, अंड्यात असणारी पोषणमूल्यं हृदय, मेंदू आणि स्नायूंना बळकटी देण्याचं काम करतात. काही लोक फक्त अंड्याचा पांढरा भाग खातात आणि पिवळा टाळतात, पण पिवळ्या भागात अनेक महत्त्वाची पोषणमूल्यं असतात. योग्य प्रमाणात पूर्ण अंडं खाल्लं तर ते शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतं.
अंडं हे एक पूर्ण अन्न आहे, ज्यात शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रमुख पोषणघटकांचा समावेश आहे. ते सहज मिळतं, स्वस्त आहे आणि झटपट शिजतं. त्यामुळे दररोज एक ते दोन अंडी खाणं अनेकांसाठी सुरक्षित आणि उपयुक्त ठरू शकतं. मात्र आरोग्याच्या विशिष्ट अडचणी असणाऱ्यांनी वैयक्तिक गरजेनुसार निर्णय घ्यावा. योग्य प्रमाणात, संतुलित आहाराचा भाग म्हणून अंड्याचं सेवन केल्यास ते निश्चितच तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
हेही वाचा: