ओपनर पृथ्वी शॉ काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र क्रिकेट संघासोबत जोडला गेला. टीम इंडियातून गेली अनेक वर्ष बाहेर असलेला हा फलंदाज याआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करत होता. मात्र आता पृथ्वी महाराष्ट्रासाठी खेळणार आहे. त्यानंतर आता टीम इंडियासाठी खेळणाऱ्या अमरावतीच्या विकेटकीपर बॅट्समनने पृथ्वीसारखाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या खेळाडूच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तो नक्की कोण आहे? हे जाणून घेऊयात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2025 मध्ये 18 वर्षांची प्रतिक्षा संपवली आणि अखेर आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. आरसीबीला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात अनेक खेळाडूंनी योगदान दिलं. यात विकेटकीपर बॅट्समन जितेश शर्मा याचंही योगदान राहिलं. जितेशने काही सामन्यांत आरसीबीचं नेतृत्वही केलं. मात्र आता जितेशने मोठा निर्णय घेतला आहे. जितेश लवकरच नव्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.
जितेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाचं प्रतिनिधित्व करतो. मात्र आता जितेश 2025-2026 या देशांतर्गत हंगामात विदर्भाकडून खेळताना दिसणार नाही. जितेश आता बडोदाचं प्रतिनिधित्व करणार आहे. जितेश गेल्या हंगामात रणजी ट्रॉफी स्पर्धेतील एकही सामना खेळला नव्हता. तेव्हा अक्षय वाडकर याला प्राधान्य देण्यात आलं होतं. मात्र जितेश व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये (टी 20 आणि वनडे) करुण नायर याच्या नेतृत्वात खेळत होता. मात्र आता जितेश बडोद्यासाठी खेळणार आहे. जितेशचा हा निर्णय त्याच्या रेड बॉल करियरच्या हिशोबाने निर्णायक ठरु शकतो.
विदर्भ ते बडोदा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रक्रिया सुरु आहे. जितेशच्या या नव्या प्रवासात टीम इंडियाचा आणि आरसीबीचा ऑलराउंडर कृणाल पंड्या याचं मोठं योगदान आहे. या दोघांनी आरसीबीसाठी आयपीएल ट्रॉफी जिंकली. या दरम्यान दोघांमध्ये दृढ नातं तयार झालं. त्यामुळे हे सर्व शक्य झालं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
जितेशने फर्स्ट क्लास क्रिकेटची सुरुवात 2015-2016 या हंगामापासून केली. जितेशने तेव्हापासून फक्त 10 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 21.48 च्या सरासरीने 661 धावा केल्या. जितेशने या दरम्यान 4 अर्धशतकं झळकावली आहेत. जितेशने अखेरचा फर्स्ट क्लास सामना हा जानेवारी 2024 मध्ये खेळला होता.