महाराष्ट्रात बुधवारी जन सुरक्षा विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर झालं. सरकारनुसार त्यांनी हे विधेयक दहशतवादी विचारांना खतपाणी घालणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्यासाठी आणलं आहे. पोलिसांना डाव्या विचारसरणीच्या संघटना आणि बंडखोरांविरुद्ध कारवाई करताना अडचण येते, म्हणून हा कायदा आणण्यात आला आहे. मात्र या विधेयकाला काँग्रेसने विधानसभा आणि विधान परिषदेत हवा तसा विरोध केला नाही. त्याची काँग्रेस हायकमांडने गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेस हायकमांडने या प्रकरणी थेट पक्षाच्या आमदारांना नोटीस बजावून जाब विचारला आहे.
काँग्रेस हायकमांडने आमदारांना नोटीस पाठवून विचारणा केली आहे. आमदारांना या नोटिसीचे उत्तर देणं बंधनकारक आहे. तुम्ही जन सुरक्षा विधेयकाला विरोध का नाही केला? असा प्रश्न काँग्रेस हायकमांडने नोटिसद्वारे पक्षाच्या सर्व आमदारांना विचारला आहे. या विधेयकाला प्रत्येक स्तरावर विरोध करा, असे काँग्रेस हायकमांडने आमदारांना निर्देश दिले होते. जनतेमध्ये जाऊन सांगा या विधेयकात काय चुकीचं आहे?. हे विधेयक सभागृहात मंजूर होत असताना काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी एकत्र सभागृहातून वॉकआऊट केलं. पण यानंतर त्यांनी कुठलही विरोध प्रदर्श केलं नाही. त्यामुळे कदाचित काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील आपल्या पक्षाच्या आमदारांवर नाराज होऊन नोटीस पाठवली.
या विधेयकात काय खास आहे?
गुन्हा अजामीनपात्र
अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याचा उद्देश
राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यास आरोपांशिवया ताब्यात घेता येणार.
या कायद्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक किंवा त्या पेक्षा वरच्या रँकचा अधिकारी चौकशी करेल.
चार्जशीट ADG लेवल अधिकाऱ्याच्या मंजुरीनंतर दाखल होईल.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरणाऱ्या संघटनांविरुद्ध थेट कारवाई करता येईल.
संघटनांना बँक अकाऊंट सुद्धा गोठवता येतील.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
दरम्यान, या प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला अशी कोणतीही नोटीस आली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. “मला हायकमांडची कुठलीच नोटीस आली नाही. ज्या दिवशी चर्चा होती, त्यादिवशी मी बँकेच्या निवडणुकीत होतो. सभागृहात मांडलेली माहिती हायकमांडकडे मांडणार आहोत. प्रदेश अध्यक्षांना देणार आहोत. विरोधकांनी वॉकआऊट करण्याची गरज होती. अनेक कायदे असताना, नव्याने कायदे आणून सरकार विरोधकांवर दबाव टाकून अर्बन नक्षलच्या नावाखाली विरोधकांचे तोंड दाबण्याचे काम करत आहे” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.