टीम इंडियाला शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेची सुरुवात विजयाने करता आली नाही. इंग्लंडने टीम इंडियावर मात करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपल्या पहिल्या मालिकेची सुरुवात विजयाने केली. त्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडवर बर्मिंगहॅममध्ये 336 धावांनी धमाकेदार विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली. तर लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याची संधी होती. मात्र भारताचा अवघ्या 22 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये असलेला कर्णधार शुबमन गिल नाराज दिसला. शुबमन पराभवानंतर रडत असल्याचंही म्हटलं गेलं. तसा दावा करणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शुबमनचा तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हीडिओत शुबमन ड्रेसिंग रुममध्ये बसलेला आहे. शुबमन फार निराश दिसत आहेत. तसेच या व्हीडिओत हेड कोच गौतम गंभीर कुणासोबत बोलत आहेत. तर त्यामागे शुबमन एका हाताने स्वत:चा चेहरा लपवताना दिसत आहे. गिल वारंवार डोळ्यांवरुन हात फिरवताना दिसत आहे. या व्हीडिओत टीम इंडियाच्या पराभवाचं शल्य शुबमनच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
टीम इंडियाने लॉर्ड्समध्ये इंग्लंडला पहिल्या डावात 387 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर टीम इंडियानेही 387 धावाच केल्या. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 192 धावांवर रोखलं. त्यामुळे भारताला 193 धावांचं आव्हान मिळालं. मात्र भारताचा डाव हा 170 आटोपला. इंग्लंडने अशाप्रकारे हा सामना 22 धावांनी जिंकला. इंग्लंडने अशाप्रकारे 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.
पाहा व्हायरल व्हीडिओ
टीम इंडियाच्या टॉप आणि मिडल ऑर्डरने दुसऱ्या डावात घोर निराशा केली. मात्र त्यानंतर ऑलराउंडर रवींद्र जडेजाने शेपटीच्या फलंदाजांसह संघर्ष केला. मात्र भारताला सामना जिंकता आला नाही. जडेजाने नाबाद 61 धावा केल्या. कर्णधार शुबमन आणि प्रमुख फलंदाजांनी या सामन्यातील दोन्ही डावात निराशा केली. परिणामी टीम इंडिया विजयी होऊ शकली नाही. त्यामुळे टीम इंडियासमोर चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान असणार आहे.