स्टेट बँकेच्या 25000 कोटींच्या क्यूआयपीवर पैशांचा पाऊस,देश विदेशातून पैशांचा ओघ
Marathi July 18, 2025 06:25 PM

सिप मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियानं 25 हजार कोटी रुपयांची उभारणी QIP ला शेअर विक्री करुन करण्याचा निर्णय घेतला होता. आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार स्टेट बँकेच्या QIP योजनेला मोठं यश मिळालं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट योजनेवर साडेचार पट बोली लागली आहे. विशेष बाब म्हणजे ब्लॅकरॉक ग्रुप, अमेरिकेतली मिलेनियम कॅपिटल पार्टनर्स, लंडनमधील हेज फंड मार्शल या सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार एसबीआयच्या 25000 कोटींच्या क्यूआयपीसाठी  120 संस्थांनी 1.10 लाख कोटी रुपयांच्या बोली लावल्या आहेत.

इकोनॉमिक टाइ्सच्या रिपोर्टनुसार बाजारातील या शेअर विक्रीसाठी देशांतर्गत संस्थांसह विदेशाती संस्थांनी देखील मोठ्या प्रमाणावर बोली लावली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून अशा प्रकारे शेअर विक्री केली जाणं हे क्वचितच घडू शकतं. यामुळं विविध गुंतवणूकदार संस्थांनी स्टेट बँकेच्या क्यूआयपीवर आक्रमकपणे बोली लावली आहे.

भारतातील कोणत्या संस्थांनी बोली लावली?

स्टेट बँकेच्या QIP वर  बोली लावणाऱ्या संस्थांमध्ये भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी), एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्श्युरन्स, क्वांट म्युच्युअल फंड आणि व्हाइट ओक कॅपिटल, एचडीएफसी आणि आयसीआयसीईय प्रुडेंशियल म्युच्युअल फंडनं देखील बोली लावली आहे. रिपोर्टनुसार मार्च 2025 अखेर स्टेट बँक ऑफ इंडियाचा  कॉमन इक्विटी टियर I (CET-1) चं प्रमाण 10.81 टक्के होतं. जे सेबीच्या नियमानुसार 8 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

स्टेट बँकेनं  QIP निश्चित करताना एका शेअरची किंमत 811.05 रुपये निश्चित केली आहे. बँक याद्वारे  308.2 दशलक्ष नवे शेअर संस्थात्मक गुंतवणूकादारांसाठी जारी करणार आहे. यामुळं सरकारची बँकेतील भागिदारी 56.92 टक्क्यांवरुन 55.02 टक्क्यांवर येईल.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये घसरण

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्यूआयपीवर मोठ्या प्रमाणावर बोली लागली असली तरी शेअर बाजारात बँकेच्या स्टॉकमध्ये घसरण झाली. एसबीआयच्या स्टॉकमध्ये आज 5.35 रुपयांची घसरण झाली आहे.  बीएसईच्या डेटानुसार देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेचं मार्केट कॅप 735165.58 कोटी रुपये इतकी आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.