वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 स्पर्धेची सुरुवात 18 जुलैपासून होणार आहे. माजी दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळतात. यंदा स्पर्धेचं दुसरं पर्व आहे. मागच्या पर्वात भारताने जेतेपद मिळवलं होतं. युवराज सिंगच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारताचा पहिला सामना शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेतील हा चौथा सामना असणार आहे. भारतीय संघात शिखर धवन, सुरेश रैना, हरभजन सिंग या सारखे दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. तर पाकिस्तान पहिला सामना इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 20 जुलैला भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरु होणार आहे. यामुळे क्रीडारसिकांना पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान गरळ ओकणारा शाहीद आफ्रिदी समोर असणार आहे.
स्पर्धेत एकूण सहा संघ असून भारताचं नेतृत्व युवराज सिंग, पाकिस्तानचं नेतृत्व शाहीद आफ्रिदी, दक्षिण अफ्रिकेचं नेतृत्व एबी डिव्हिलियर्स, वेस्ट इंडिजचं नेतृत्व ख्रिस गेल, इंग्लंडचं नेतृत्व इऑन मॉर्गन आणि ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व ब्रेट ली करणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 18 जुलैला होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना 2 ऑगस्टला होणार आहे. या स्पर्धेत 6 डबल हेडर सामने असणार आहेत. यात 19 जुलै, 22 जुलै, 27 जुलै, 29 जुलै, 31 जुलैला प्रत्येकी दोन सामने असतील.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड एपवर असेल. नाणेफेकीचा कौल भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता होईल. तर सामन्याला सुरुवात 9 वाजता होणार आहे.
भारताचा संघ : शिखर धवन, सुरेश रैना, युवराज सिंग (कर्णधार), गुरकीरत सिंग, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, अंबाती रायुडू (यष्टीरक्षक), रॉबिन उथप्पा (यष्टीरक्षक), अभिमन्यू मिथुन, हरभजन सिंग, पवन नेगी, पियुष कुमार, वरुण कुमार, वरुण कुमार, अंबाती रायडू.
पाकिस्तानचा संघ : शर्जील खान, कामरान अकमल, युनूस खान, मिसबाह-उल-हक, सर्फराज अहमद (यष्टीरक्षक), शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल रज्जाक, वहाब रियाझ, सईद अजमल, सोहेल तन्वीर, सोहेल खान, आसिफ अली, सोहेब मकसूद, आमिर यामीन.