मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड हे इंग्लंडमधील अनेक जुन्या स्टेडियमपैकी एक आहे. या स्टेडियममध्ये 23 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या स्टेडियमध्ये इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात गेली अनेक वर्ष सामना झालेला नाही. भारतासाठी या स्टेडियममध्ये चांगल्या आठवणी नाहीत. भारताला या मदैानात आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. इतकंच काय तर भारतीय फलंदाजांना गेल्या 3 दशकांपासून शतकही करता आलेलं नाही.
टीम इंडियाने या मैदानात 2019 साली सर्वात मोठा सामना हा आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला होता. भारताला तेव्हा उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र भारताने या स्पर्धेत पाकिस्तानावर याच मैदानात अविस्मरणीय असा विजय मिळवला होता. रोहित शर्माने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतक केलं होतं. तर त्यानतंर ऋषभ पंत याने 2022 साली एकदिवसीय सामन्यात शतक केलं होतं.
भारतीय फलंदाजांनी या मैदानात एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक केलं आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाज काही खास करु शकले नाहीत. भारताला या मैदानात कसोटी सामना जिंकता आलेला नाही. तसेच एकाही फलंदाजाला गेल्या अनेक वर्षांपासून शतकही करता आलेलं नाही. या मैदानात भारताकडून 1990 साली कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने शतक केलं होतं. अझरुद्दीने सामन्यातील पहिल्या डावात शतक केलं होतं. तर दुसऱ्या डावात 17 वर्षीय युवा सचिन तेंडुलकर याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठोकलं होतं.
अझरुद्दीन आणि तेंडुलकर यांच्यानंतर एकाही भारतीय फलंदाजाला या मैदानात कसोटीत शतक करता आलेलं नाही. त्यामुळे भारताची 35 वर्षांपासूनची प्रतिक्षा कायम आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात 2014 साली याच मैदानात सामना खेळवण्यात आला. इंग्लंडने या सामन्यात भारतावर डाव आणि 54 धावांनी विजय मिळवला. तेव्हा भारताकडून कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सर्वाधिक 71 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात एकही सामना झाला नाही.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात 2021 साली मँचेस्टरमध्ये कसोटी सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र कोरोनामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता. हा सामना 2022 मध्ये एजबेस्टनमध्ये खेळवण्यात आला होता. त्यामुळे आता कोणता भारतीय फलंदाज मँचेस्टरमध्ये शतक करुन 35 वर्षांची प्रतिक्षा संपवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.