Karun Nair : करुण नायरला घर वापसीची परवानगी, टीमकडून रिलीज
GH News July 22, 2025 07:14 PM

देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्यानंतर करूण नायरला टीम इंडियाचे दरवाजे उघडले. करुण नायर टीम इंडियात पुनरागमनासाठी गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करत होता. पण आठ वर्षानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. मात्र तीन सामन्यांच्या सहा डावात त्याची बॅट काही चालली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत त्याला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवलं. पण तिथेही काही खास करू शकला नाही. असं असताना त्याला चौथ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत सांगणं कठीण आहे. असं असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. करुण नायरला घर वापसीची परवानगी मिळाली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनने करुण नायरला ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. म्हणजेच करुण नायर आता विदर्भाचा संघ सोडून कर्नाटककडून खेळण्यास सज्ज झाला आहे. करुण नायर मागच्या तीन वर्षांपासून विदर्भ संघासाठी खेळत होता. त्यात त्याने जबरदस्त कामगिरी केली.

करुण नायरसाठी विदर्भाचा संघ लकी ठरला असंच म्हणावं लागेल. कारण त्याने रणजी स्पर्धेतील 16 डावात 53.93 च्या सरासरीने 863 धावा केल्या. यात त्याने एकूण 4 शतकं ठोकली. इतकंच काय तर केरळ विरूद्धच्या अंतिम सामन्यातही शतक ठोकलं. त्याच्या या खेळीच्या जोरावर विदर्भने रणजी ट्रॉफी किताब जिंकला. करुणने रणजीसोबत विजय हजारे ट्रॉफीतही चांगली कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत सलग पाच शतकं ठोकली. त्याचा स्ट्राईक रेट 120हून अधिक होता. त्याने 8 डावात एकूण 779 धावा केल्या. इतकंच काय तर 542 धावा बिन बाद केल्या आहेत. हा लिस्ट ए मधील मोठा विक्रम आहे.

करुण नायरला इंग्लंड दौऱ्यात स्वत:ला सिद्ध करता आलं नाही. एकीकडे इतर फलंदाज शतकी खेळी करत होते. तेव्हा करूण नायरची बॅट शांत होती. टीम इंडियात पुनरागमन झाल्यानंतर त्याला एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावातच तो शून्यावर बाद झाला. मागच्या सहा डावात त्याने 0, 20, 31, 26, 40 आणि 14 धावांची खेळी केली. आता चौथ्या कसोटीत त्याला संधी मिळाली आणि त्याने चांगली कामगिरी केली नाही तर त्याच्यासाठी ही शेवटची कसोटी मालिका ठरू शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.