मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. ही घटना सागर जिल्ह्यातल्या टीहर गावात घडली आहे. कुटुंबातील चारही व्यक्तींचा मृत्यू हा विष प्राशन केल्यामुळे झाला आहे. ही घटना खुरई पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रामध्ये घडली आहे. घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून, हे मृतदेह पोस्टमार्टसाठी पाठवण्यात आले आहेत. पोस्टमार्टम अहवालानंतरच या घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकेल असं पोलिसांनी म्हटलं आहे.
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. मृतांमध्ये एक व्यक्ती, त्याची आई आणि दोन मुलांचा समावेश आहे, ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याचं सांगितलं जातं आहे. हे कुटुंब टीहर गावापासून थोड्या दूर असलेल्या शेतामध्ये वास्तव्याला होतं. मनोहर सिंह लोधी असं या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मनोहर सिंह लोधी यांची पत्नी काही दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी गेली आहे. त्यानंतर ही घटना घडली आहे, मनोहर सिंह लोधी, त्यांची आई फूलरानी लोधी, त्यांची मुलगी शिवानी लोधी वय 18 व मुलगा अनिकेत लोधी वय 16 यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. यातील मनोहर यांचा मुलगा अनिकेत आणि त्यांची आई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर मनोहर यांचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. मुलीला गंभीर स्थितीमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.
आत्महत्येचं कारण अस्पष्ट
मनोहर सिंह लोधी यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार लोधी यांचं कुटुंब हे शेतात वास्तव्याला होता, त्यांची बायको काही दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी गेली होती, त्यानंतर ही घटना घडली आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली? याच कारण अजूनह स्पष्ट झालेलं नाहीये, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.