खरकटं , परत एकदा
esakal July 27, 2025 10:45 AM

गिरीश कुलकर्णी - editor@esakal.com

निवेदिका : नमस्कार, होय! होय! बरोबरच आहे ! खरकटं! असंच नाव आहे आजच्या या परिसंवादाचं!आम्ही नेहमीच काहीतरी नवं करतो. खरकटं म्हणजे कर्त्यानं, म्हणजे जेवणकर्त्यानं न भोगता सांडलेलं! म्हणजे, जरी सांडलं, तरी होतं उपयुक्तच! तर मग सांडल्यावर लगेचच त्याचं एवढं वावडं का? ताटाबाहेर काढनारे तुमीच आनि बाहेर काढायचे निकष पन तुमचेच आणि निकष म्हंजे तरी काय? तर फक्त तुमचा, म्हणजे कर्त्याचा हलगर्जीपणा? श्शीऽऽ! घृना येते मला. याच निकषानं तुम्ही आजवर कुनालाही ह्याच्याबाहेर, त्याच्याबाहेर ढकलत राहिलात. ताटातलं बाहेर सांडन्याचा उद्योग सांगितला कुनी तुम्हाला? समजता कोन स्वतःला? अस्सं कानफाट फोडवंसं वाटतं ना... तुडवून काढील एकेकाला…

साहेबांचा पीए : मॅडम… मॅडम... पानी प्या…पानी प्या..!

निवेदिका : (पाणी पिऊन) थॅक्स सर! आजकाल हे असं होतं. एन्ग्झाईटी ट्रॅगर होते अचानक! सुचेनासं होतं! असो. तर, या ! या! या! खरकट्याच्या या दुसऱ्या भागात आपलं स्वागत करतान्ना मला खूप आनंद होत आहे. मागच्या वेळी प्रमानेच आज पन आपन जे जे पानाच्या बाहेर पडलेलं आहे. नियमात बसत नाई म्हणून बाहेर काडलेलं, सांडलेलं आहे त्याची व्यथा ऐकनारोत. मागच्या वेळी ते येऊ शकले नव्हते पन आज ते आलेत. होय ! खुद्द साहेब आज आलेत. जोरदार टाळ्या झाल्या पायजेलेत.

मी हट्टच केला, म्हनलं मला तुमी पायजेच. मग ते पन आलेत. आनि मीही आज येतानाच पिल घेऊन आले आहे. म्हंजे एग्झाईटीची! हुहुहु! पन तरीही एन्ग्झाईटी जानवते आहे. पण ही ती नाहीए. वेगळीच्चे. हुहुहुहु! साहेब : (पीएच्या कानात) आयला चुकलो काय युन? मॅडमला म्हनाव रील व्हायरल हुईल, आसंल नका बोलू.

निवेदिका : तर आजंही आपन आमच्या शिक्षण संस्थेनं आयोजित केलेल्या या खास परिसंवादात सहभागी होत आहात हे मला महत्त्वाचं वाटतं. मागच्या वेळी ज्यांला बोलायला मिळलं नव्हतं ते तं आलेच्चेत पन अजून पन एंन्ट्रया आल्यात. आपन सगळ्यांना ऐकनारोत आनि मेन म्हंजे साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला होनारे. तर सुरवात करू खरकटं चिवडायला, म्हंजे बोलायला. हं सर, तुमी तुमी, निळा चौकडा, हो हो, तुम्हीच… करा सुरू…

निळा चौकडा : मॅडम आजच्या ह्या मॅाडर्न सोसायटीनी सगळं ताटाभाएरचं आत घेतलंय. सगळ्यांना आपलं म्हनलेलंय. भ्रष्टाचारापासून दहशतवादापर्यंत सगळ्याच गोष्टींला मान्यता मिळून राहिलीए. तर ती चांगलीच गोष्टंय पन सायन्सला का म्हनून खरकट्यागत ट्रीटमेंट, त्येच कळत नाही. आर्कीमिडीज आनि पायथागोरस या चुलत-मावस भावांनी इसवीसनापूर्वी जो रस्ता दाखवला तो आज पंचवीसाव्या शतकात पन आपल्याला सापडत नाहीए. साहेब : (पीएच्या कानात) पंचवीसावं शतकं हे? च्यायला गपागप जाताताहां दिवस. बरं हे दोघं भाऊ कोनेत?

सा.पी. : त्ये मागंच मेलेलेत सर. त्यांचा काही विषय नाही

साहेब : आजकाल गेलेलेच डोचक्यावं बसाय लागलेत. पॅालिटीक्समदे मेलेल्याचं महत्व वाढलंए. त्यातून भाऊ-भाऊ. समजून घ्या. मॅडमला म्हनावं ह्याला हटका आत्ताच. लफडंच नको. भाऊ-भाऊ एकत्र नकोएत.

सा.पी. : (निवेदिकेच्या कानात) खुसुरफुसुर…!

निवेदिका : एक मिंटं ! तुम्ही मुद्याचं बोला. व्यथा मांडा फक्त.. कुठल्याच भावांना भाव दिला जानार नाईय्ये. हॅहॅहॅहॅ मुद्दा बोला, नाईतरं बसा खाली…

निळा चौकडा : मुद्दा हा आहे की माझं सायंटिफिक खेळण्याचं दुकानयं. तर बाजूलाच असलेल्या मठाच्या आवारात नारळ हाराची दुकानं वाढवायची म्हनून मला दुकान हालवायला सांगितलंय. मला खरकट्यागत दूर लोटण्यात येतंय. तसाही धंदा कमीचं हाय. लहान पोरं अश्राप असल्यानं ते खेळनी घ्यायला बगतात पन पालक त्यांना दामटून मठात नेतात. साहेब मठाचे ट्रश्टीएत. तर आज त्यांच्याकडून सायन्सला वाईट ट्रीटमेंटे.

निवेदिका : (पेला फेकून मारते) वाट्टेल ते बोलू नका. साहेबांच्या विद्यापीटात सगळ्या सायन्सचे कोर्सेस हायेत. आज ज्ञानेश्वर माऊलींच्या आशिर्वादाने मेडिकल मदलं दुरबिनीतलं विज्ञान पन आपन आनंलय. पित्ताशयातले खडे काढून घ्या एकदा दुर्बिनीतून. खेळन्यातनं सायन्स शिकन्यापेक्षा तुमी कोर्सला ॲडमिशन घ्याना. शिक्षण हा गंभीर विषये. खाली बसा. नेक्श्ट, हं... हो हो तुमीच ! फ्लॉरल प्रींट, बोला तुमी !

फ्लॉरल प्रिंट : मॅडम, सर, आयामे रील सर्विस प्रोवायडर, माय श्टुडीओ हेल्पींग द रील मेकर यंगर जनरेशन

निवेदिका : एक मिंट! मराठी एवढी अभिजीत भाषा आस्ताना तुम्ही इंग्लिशमदे बोलू शकत नाई. आमच्या इथे युन जर तुम्ही आस्ले अपमान करनार असाल तर आशी कानफाट फोडील ना…

सा.पी. : मॅडम , पानी प्या! पानी प्या!

निवेदिका: सॉरी हां! पिल घ्युन पण त्रास होतोच. आनि हे पन बगाना कशे बोलतात. फ्लोरल प्रिंट मराठीत बोला

फ्लो प्रि : आई काण्टं. आय सिट.

निवेदिका : ठीक्के. सीट तर सीट. मराठीत बोलायला लागेल हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आताशी पहिलीला हिंदी दिलीय. दहावीपर्यंत युस्तोवरतरी मराठी बोल्लीच पाहिजे. नंतर मग काय पन बोला. चला, पुढे कोने? हं तुमी शॉर्ट कुडता, तुमीच. बोला तुमी... (बसते) नाऊ आय सिट, हॅहॅहॅहॅ (स्वतःशीच हसते)

शॅार्ट कुडता : माझा विश्वास बसत नाहीये की खरोखरच मला बोलण्याची संधी मिळाली आहे. मी काहीच अपेक्षा न बाळगता आलो होतो. पण महानोर म्हणाले तसं ‘‘कोणती पुण्ये अशी येती फळाला’’

निवेदिका : (फणकाऱ्याने उठत) हॅलो, हॅलो,शॉर्ट कुडता, दुसऱ्याचं काही बोलायचं कारण नाही. तुमचं काय ते सांगा. महापौरांना मध्ये ओढू नका. पुढारी म्हंजे काय बुजगावणं वाटलं काय? कुठल्याही कावळ्यानं डोईवर हागायला?

सा.पी. : मॅडम मॅडम, ते महानोर म्हणाले महापौर नाही.

साहेब : कोनयं महानोर? साऊथचे कुनी तरी कन्नड युट्यूबरेत ना ते? गुगल मारा बरं…

सा.पी. : कवी होते म्हणे...

साहेब: होते म्हंजे? आता नाईय्येत? ऑ? आज सगळेजण गेलेल्याचीच नावं का घेतायत?

सा.पी. : चालू मान्सावर बोलन्याची सोयच आपन ठेवली नाईये त्यामुळं असेल. खॅकखॅक्खॅ

साहेब: (तोंड लपवून) घुरहुरघुरगुरख्वाऽईऽक

मॅडम : हां बोला बोला, बरोबरच आहे. पापपुण्याचा हिशोब मागणारी कविता आहे.

शॅार्ट कुडता : (क्षणभर दिग्मुढ) अं? हो हो ! तर माझी व्यथा म्हंजे अशी आहे की मी एक साधा सरळ माणूस आहे. साधुवाणीच म्हणा ना. माझा व्यापार कधीच नव्हता पण माझी नाव तेवढी बुडत चाललीय. तरी मी दरवर्षी साहेब पाठवतील त्या फुकट यात्रेला जातो. साहेबांचे मोठे मोठे होर्डिंग किळस येऊनही पाहतो. पोटातल्या ओकाऱ्या ओठापर्यंत न आणता घरी जाऊन काढतो. साहेबांच्या गाड्यांचा ताफा जात असताना निमूट वाहतूक कोंडीत अडकून पडतो. साहेबांचे बगलबच्चे जामिनावर सुटून आले की होणारी आतषबाजी गच्चीवर जाऊन पाहतो.

मॅडम (पीएच्या कानात) साधुवाणी ? ॲपोजिशनचाए काय?

सा.पी. : नाही नाही. धार्मिक मॅटर असनार. लगीच गुगल मारत जा. कुठल्याच समाजाला दुखवायचं नाही मॅडम, मम म्हणायचं सगळीकडं. नंतर झुंजवायचे कोंबडे निवांतपनी (खॅखॅकखॅ)

शॅार्ट कुडता : खाजगी कंपनीत नोकरी होती. एकच मुलगा. त्याच्या शिक्षणाच्या निमित्ताने साहेबांच्या संस्थेची एकाची दोन कॉलेजं होण्यासाठी मदत म्हणून भरपूर पैसे भरले. नंतर साहेबांच्या उद्योगपती मित्रांना भरपूर कर्ज देता यावीत म्हणून साहेबांच्याच बॅंकेतून शैक्षणिक कर्ज घेतलं. प्रामाणिकपणे व्याजासकट मुद्दल भरलं. आता निराश्रित म्हाताऱ्यांसाठीच्या सोसायटीत मुलगा घर घेऊन देईल, मग आम्ही दोघं नवराबायको जुनी जुनी नाटकं, परत परत बघत, खॅकटून हसू अशी स्वप्न बघत असतानाच कामावर असताना फोनवर गेम खेळतो म्हणून त्याला कंपनीतून तडकाफडकी काढून टाकलं. सगळेच एकेकट्यानं वा दुसऱ्याबरोबर गेम खेळत असताना माझ्या मुलाबाबतच हा दुजाभाव का? तरी कुणालाच आक्षेप असू नये म्हणून तो आपलं नाव साडेसतरा असं अंकात सांगतो. बापाचं नाव लावत नाही, आडनाव सुद्धा बदलून लुळूबुळू असं करून घेतलंय. आणि तरीही त्याला खरकट्यासारखं बाहेर टाकलं जातंय. याची साहेबांनी नोंद घेऊन न्याय द्यावा, एवढीच विनंती आहे.

साहेब : मला कदी बोलायचंय?

सा.पी. : शेवटी ठेवलंय तुमचं. तुमच्या नंतर परत वचवच नको म्हणून

साहेब : मग ठीके. नाईतं माजंच खरकटं करायचे म्हनून म्हनलं… खॅक्घुरघुर्र. बास करा म्हनावं आता त्या खुळखुळ्याला

मॅडम : हं लुळूबुळू बसा ! बसा खाली. कळलं तुमचं रडगाणं. नेक्सट? हे तुमी, तुम्हीच… हो हो बोला…

गोल्ड मॅन : हा हा बोलतो ना. आपन गोल्ड मॅन रॉकी निकाळजे म्हनून आलोय. काय झालंय की आपन आजपर्यंत कष्टानं वर आलेलोय. काय झालं की रोडमदी शेती गेली. त्याच्या कामपनसेशन मदून दोन चार टीपर, जेसीबी आनि गोल्ड घेतलं. मग गावातली जुनी नदी होती. बंदच होती तशी. पन आपन तिच्यातली वाळू विकून गावाचा विकास केला. गोल्ड घेतलं. मग साहेबांचे हात बळकट करायला गावातल्या युवकांना कॅरम क्लब टाकून एकत्र आनलं. जीम टाकून दिली. त्यांच्या बॉड्या बनल्यावर सोत्ता फुडं होऊन फुल दहशत पसरवली. तहशीलदार वाळू काडू देत नव्हता तर मी सोत्ता त्याचं थोबाडं फोडलं. दहशतीतून मग अडल्या नडल्या बिल्डर लोकांना जागा मिळवून द्यायला मदत करता आली. त्यांनी आपनहून पोरांच्या खुराकाला पैशे देनं चालू केलं. त्यातून थोडं गोल्ड घेतलं. मग डायरेक मुंबईत विधानभवनात फाईटींग करून राडा घातला. चानलवाल्यांना पैशे द्युन त्याची रीलं वायरल केली. तेंव्हा थोडं गोल्ड मोडलं पन त्यामुळं सत्ताधारी पक्षाचं लक्ष गेलं. लगीच आपला पक्षप्रवेश झाला. हायकमांडला पैशे द्युन भावासाठी आमदारकीचं तिकीट घेतलं. तवा थोडं गोल्ड मोडलं. पन आमदार पळवापळवी मदी चांगले पैशे झाले. मग थोडं गोल्ड घेतलं. आता शंभर तोळे केलेत आनि आईची इच्छा म्हनून...

साहेब : ओऽऽ आवरा म्हनावं ह्याला. ह्याज्या आयला सगळा कच्चा चिठ्ठा भाएर काढतोय का काय?

सा.पी. : मॅडम? काये हे? बसवा त्याला.

निवेदिका: अहो माझे मिश्टर त्यांच्याकडे अकाऊंटंट म्हनून काम करतात. मी मिश्टरांच्या एम्प्लॅायरला कसं बोलू? ह्यांची नोकरी गेली तर अडचन होईल. मला साहेबांबरोबर दौऱ्यावर येता यायचं नाही ना. तरी मी प्रयत्न करते. (एकदम लगालगा उठून माईक वर) टाळ्या ! टाळ्या झाल्या पाहिजेत या कहानीसाठी. यातून दिसून येतं की समाजात जो विकास होतोय तो काय जादूनी होत नाईय्ये तर आशे कष्टकरी तो करतायत आनि ह्या सरकारच्या कृपेनी सोन्यासारख्या कष्टाचं सोन्यानी मोल होतंय. टाळ्या झाल्या पाहिजेत निकाळजे सरांसाठी!

गोल्ड मॅन : थॅंक्यू सगळ्यांना. पन मॅडम, माझं आजून हाए पुढं…

निवेदिका : ऐकत रहावं आसच आहे तुमचं पन साहेबांना डीसीएमच्या कार्यक्रमाला जायचंय पुढं त्यामुळे…

गोल्ड मॅन : ऐकाना, माजी एवढीच व्यथाए की मला व्हिसा दिनात. समाजकार्य करताना केशी टाकतात ॲपोजिशन. पोलिस व्हॅरीफिक्शन्ला तडीपारी चालत नाई म्हने. एवढं बारीक कारन काढून व्हिसा देईनात. युवक सगळे बाकू ला जायला तरसलेत. म्हनून म्हनलं की साहेब जर तेवढा मला आत घेतला असता.

निवेदिका: हो हो! साहेबांनी ऐकलंय सगळं. बसा तुम्ही. आता मी आमचे आशास्थान, प्रेरनादायी नेतृत्व असलेल्या साहेबांना विणंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं.

जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांसाठी…हुहुहुहु! हाऊ एक्साईटेड मी!

साहेब : (पी ए च्या कानात ) ओ, आवरा हीला, हीतच मुका घ्यायची बेनी….

पी.ए. : खॅकख्यॅक कॅख्यॅक कॅकॅक कॅख्यॅकखॅक

(ठसका लागतो)

निवेदिका: पानी प्या सर पानी प्या!

साहेब: आजच्या कार्यक्रमाला आलेले सगळे पाहुने आनि समाजातले मोठे मोठे नागरिक आनि बंधू भगिनी! लाडकी भगिनी योजनेमुळं या म्हाराष्ट्राचा कायापालट झालेलाए. सगळ्यांना आपन फुकट पैशे वाटतोय. आज आपन टेंडरपन सगळे ॲानलाईन केलेलेत. शेतकऱ्यांना आपन प्रादान्य दिलेलंय. पूर्ण महाराष्ट्रभर आपन सहा पदरी रस्ते टाकतोय. त्याच्यावर उड्डाणपूल टाकतोय. आन त्याच्यावं मेट्रो टाकतोय. शेतकऱ्यांला एवढं कॉम्पेनसेशन मारतोय की गावागावात गोल्डमॅन झालेलेत. त्यांला काहीच करायची गरज उरली नाहीये. आशे सगळे लोक समाजकार्याला उपलब्ध झालेलेत. त्ये ट्रोलिंगच्या माद्यमातनं असत्याचा पर्दाफाश करताएत. पोलिसचा नसंल एवढा धाक आज अशा सामाजिक कार्यकर्त्यांचाए. पन तुमी बगा, आपल्याकडच्या सगळ्या शहरामदी जसं पावसात पानी तुंबतं, तशे विरोधक आजून जुनेच मुद्दे घ्यून बसलेत. (हशा) सगळीकडंच ट्रॉफिक जॅम होतोय ओ, त्याचं एवढं काय नाही.

तासा दोन तासांनी तरी गाडी निगती पन विरोधकांच्या डोक्यातला जॅम सुटायला मागत नाही. (हशा) आज आमचे सीटीतले लोक आवोकॅडो, ब्रॅाकॉली लेटुऽऽस खातात. त्यासाठी त्यांना युऽऽएसऽ ला जायची गरज नाहीए. हे त्ये बगत नाहीत. मला आमच्या साहेबांचं एकच वाक्य आठवतंय. त्ये म्हनले, ‘‘तात्या ऽऽ , त्ये मला प्रायव्हेटला तात्या म्हंतात. तर म्हणाले , तात्या ऽऽ वाल्याचा वाल्मिकी होतो. समद्यांना आत घ्या.’’ आनि म्हनून आमी नॅशनल लेवलच्या युतीत घुसलो. केल्याने होत आहे, जे ते केलेची पाहिजेले. सांगायचं कारन म्हंजे या ठिकानी गोल्डमॅन निकाळजेचं काम आपन करून टाकू. ए, पानी घे रे. ( पी ए पाणी देतो. निवेदिका नुसतीच उठून खाली बसते.)

पानी हे जीवने पन तेच पानी एच्च्टुओ पने. जीवन हेच एक सायन्से आनि या ठिकानी सायन्समुळं आज करोडो लोकं ॲानलाईने हायेत. कुनी गेम खेळतय, कुनी सट्टा लावतंय, कुनी ट्रोलिंग करतंय, कुनी पैशे कमावतंय, तर कुनी गमावतंय. साधनं महत्वाची नाहीत तर ॲचिवमेंट काये ते जग बगतंय. मी तं म्हनतो आपल्या हितल्या सगळ्या स्कॅम करनाऱ्यांला सरकारनी ट्रेनिंग द्युन चीनचा सगळा पैसा आपन रातोरात वडला पाहिजे. जी जी म्हनून खरकटलेलीएत ती ती आत घ्यायची वेळ आलेलीए. (टाळ्या) खेळनी बदलली पायजेलेत कारन सायन्स बदलतंय. ज्या कुनाची ॲानलाईन रमी खेळून नोकरी गेली आसलं त्यानी त्याच ॲानलाईन रमीमदे लास वेगासचा पैसा हिकडं आनला पायजे. आज एआय मुळं काहीपन शक्य झालेलंय. शिक्षनाची सुद्धा गरज राहिली नाहीए. आज एफबी इन्श्टा ह्याच फॅमिली झालेल्याएत त्यामुळं कुनालाच एकटं वाटायचं काम नाईए. भाषेचा पन काहीच सवाल नाईए कारन एआयचा दत्तू पोपटावानी भाषांतर सांगतोय. इतिहास, भूगोल आसलं काईपन न शिकता बसल्या जागी दाही दिशा फिरता येताहेत. (पी ए चिठ्ठी देतो, ती वाचून साहेब हसतात.)

Nitish Kumar: विरोधकांकडून वेळ वाया; नितीश यांची टीका, अखेरच्या दिवशी सभागृहात गदारोळ

हॅखॅक् हॅक् खॅक्

हे म्हंताएत एवडं नॉलेज एकदम एकाच वेळी एकाच ठिकानी द्यू नका. ढगफुटी झाल्यागत व्हील. पन मी एकच सांगतो की अमेरिकेत जो एक पांडरा आजोबा अध्यक्ष आहे आनि तो जसा मनातलं वाट्टेल ते बोलतो तसं सगळ्यांनी करायला पायजेले. तरच सगळं खरकटं पानात यीन आनि एकदमच भूक भागलं. लोकशाहीची जननी असलेल्या माज्या देशात लवकरच पुन्ना सोन्याचा धूर निघेल यवडं बोलून मी थांबतो आनि आपली रजा घेतो.

निवेदिका : सगळ्यांनी जेवून जावं. जेवन आनि एक कोल्ड्रिंक फ्री आहे. सगळ्यांनी लाभ घ्यायचाय.

नंतर साहेबांचा ताफा निघाल्यानं, साहेबांबरोबर सेल्फी काढायला तुटून पडलेल्या तरुणांच्या असोशीनं, मोठ्ठाल्या रस्त्यातल्या चित्रविचित्र खड्ड्यात वाहनं अडकल्यानं, भोजन मंडपात एकच गर्दी उसळल्यानं, पनीरे का टोफू? या वादाचं भांडणात रूपांतर झाल्यानं, विचारांचं, मनस्तापांचं, शब्दांचं, लाथा, बुक्क्या, शिव्यांचं आणि मंडपातल्या पक्वान्नांचं माणसं म्हणवून घेणाऱ्या लक्तरांनी एकच मंथन घडवलं. त्यातून खरकट्यागत सांडणारं विष की अमृत हे न पुसता, ते तसंच पडलेलं पाहत काळ निश्चित गतीनं दिवस कलवत राहिला. सर्व सजीवांच्या स्वर्गीय पूर्वजांनी सोडलेल्या सुस्काऱ्यानं पृथ्वीच्या कुठल्याशा किनाऱ्यावर एक चक्रीवादळ तेवढं फिरून गेलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.