खोपोली-खालापूरमध्ये मुसळधार पावसाचा कहर;
जनजीवन विस्कळित, पाताळगंगा दुथडी
खोपोली, ता. २६ (बातमीदार) ः खोपोली-खालापूर परिसरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी अधिकच जोर धरला. गुरुवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या सततच्या कोसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर झोडपून काढला असून, सामान्य जनजीवन विस्कळित झाले आहे.
शेतीचे मोठे नुकसान झाले असून, भातलागवडीची कामे ठप्प झाली आहेत. शेतात पाणी गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत असून, तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठी जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला असून, तहसीलदार कार्यालयाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ डोंगराचा काही भाग आणि माती रस्त्यावर आल्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. प्रशासनाने युद्धपातळीवर मलबा हटवून वाहतूक सुरळीत केली. खोपोली शहरातील अनेक सखल भागांत पाणी शिरले आहे. डीसी नगर, हनुमान मंदिर परिसर, खालची खोपोली, शिळफाटा या भागांमध्ये पाणी तुंबल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. पनवेल-खोपोली, खोपोली-पेण, खोपोली-पाली मार्गांवरही ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे. दरडग्रस्त भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपत्कालीन यंत्रणा, नगरपालिका, अग्निशमन दल आणि हेल्प फाउंडेशनचे स्वयंसेवक सतर्क असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदतीसाठी सज्ज आहेत. दरम्यान, पावसाच्या तीव्रतेचा अंदाज घेत जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी व शनिवारी दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. सुदैवाने लोकल सेवा सुरळीत सुरू राहिल्याने नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला आहे.