Land Scam : जिल्ह्यात वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करणारी गँग; भूमाफिया, दलालांना महसूल अधिकाऱ्यांचा 'आशीर्वाद'
esakal July 27, 2025 10:45 PM

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये बेकायदेशीररीत्या रूपांतर करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. यासाठी एक टोळीच सक्रिय असून अनेकदा बनावट कागदपत्रे, चुकीची माहिती तसेच स्थानिक प्रशासनातील काही महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे प्रकार केले जात असल्याचे दिसून येत आहे.

यात नांद्राबादमधील गट क्र. २३ मधील जमिनीसह वर्ष २०१९ पासून ते आजपर्यंत वर्ग १ जमिनीचे वर्ग २ मध्ये बेकायदेशीर रूपांतर करण्याची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.

ही टोळी वर्ग दोनच्या जमिनींचा शोध घेते आणि सरकारी चलनांचा वापर करून त्या स्वस्त दरात खरेदी केली जाते. नंतर ही जमीन खासगी कंपन्या आणि बिल्डरांना चढ्या दराने विकली जाते. हे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने घडत आहे.

जमिनीचे बेकायदेशिररीत्या रूपांतर केल्याने शासनाच्या महसुलास मोठा फटका बसत असून खऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येत आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.

वर्ग दोनची जमीन म्हणजे काय?

जमीन हस्तांतरण (विक्री, इत्यादी) सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येत नाही. अशा जमिनींना वर्ग दोनची जमीन म्हणतात. तसेच, या जमिनींना ‘भोगवटादार वर्ग दोन’ असेही म्हणतात. वर्ग दोनच्या जमिनी सरकारी नियमांनुसार काही विशिष्ट कारणांसाठी वाटप केलेल्या असतात.

यात देवस्थान इनाम, वतन जमीन, गायरान जमीन, पुनर्वसन जमीन, सिलिंग, कुळ जमिनी इत्यादी जमिनी यामध्ये येतात. या जमिनींची विक्री किंवा इतर प्रकारचे हस्तांतरण करण्यासाठी सरकारी परवानगी घेणे आवश्यक असते. त्यासाठी रीतसर अर्ज करीत महसूल अधिकारी परवानगी देतात. त्यानंतर शासकीय नजराणा भरून त्या जमिनीचा वर्ग एकमध्ये समावेश करण्यात येतो. यानंतर जमिनींची विक्री किंवा इतर प्रकारचे हस्तांतरण करण्यात येते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.