पूर्व कांगोमध्ये पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, चर्चवर करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार इस्लामिक स्टेट इसीसच्या समर्थकांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. हा हल्ला रात्री एकच्या सुमारास पूर्व कांगोमधील कोमांडा येथील एका कॅथोलिक चर्चवर करण्यात आला, यावेळी या परिसरात असलेल्या अनेक दुकांना देखील दहशतवाद्यांनी आग लावली, यामध्ये ही दुकानं जळून खाक झाली आहेत.
कांगोमधील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी या हल्ल्यासंदर्भात एसोसिएटेड प्रेसला माहिती देताना सांगितलं की, या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे, दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. तसेच दुकानांना देखील आग लावली, आमचं बचाव कार्य सुरू आहे. ज्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे आणि जे जखमी झाले आहेत, अशा लोकांच्या कुटुंबानं इथे गर्दी केली आहे, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा हे लोक शोध घेत आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा आफ्रिकन देशांमध्ये इसीसची दहशत निर्माण झाली आहे.यापूर्वी देखील अनेकदा ISIS कडून आफ्रिकन देशांमध्ये हल्ला करण्यात आला आहे, या हल्ल्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
एडीएफ या संघटनेनं हा हल्ला केला आहे. एडीएफ हा इस्लामिक स्टेटशी संबंधित एक गट आहे, जो युगांडा आणि कांगोमध्ये सक्रिय आहे. गेल्या दहा वर्षांपासून या क्षेत्रात या संघटनेच्या कारवाया सुरू आहेत. अनेकदा या संघटनेकडून कांगोमध्ये बॉम्बस्फोट देखील करण्यात आले आहेत. ही संघटना गेल्या अनेक वर्षांपासून इस्लामिक स्टेटसोबत मिळून काम करते.
यापूर्वी देखील इसीसकडून हल्ले करण्यात आले आहेत. कांगोमध्ये दहशतवादी हल्ले करून आपली दहशत निर्माण करण्याचा इसीसचा प्रयत्न आहे. युगांडा आणि कांगोमध्ये इसीसची सहकारी असलेली संघटना एडीएफ या संघटनेकडून हल्ले केले जात आहेत. मध्यरात्री झालेल्या हल्ल्यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.