आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन जवळपास 4 वर्ष झाल्यानंतरही धावांची भूक आजही तशीच कायम असल्याचं दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक फलंदाज एबी डी व्हीलियर्स याने दाखवून दिलं आहे. एबीने वर्ल्ड चॅम्पियनशीप लिजेंड्स 2025 या स्पर्धेत सलग दुसरं शतक झळकावलं आहे. एबीने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत गोलंदाजांची जोरदार धुलाई केली होती. एबीने तशीच धुलाई वर्ल्ड चॅम्पिनशीप लिजेंड्स स्पर्धेत केलीय. एबीने साऊथ आफ्रिका चॅम्पियन्सकडून खेळताना इंग्लंडनंतर आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक झळकावलं आहे. एबीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अवघ्या 39 चेंडूत शतक ठोकलं.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लीड्समधील हेडिंग्ले येथे हा सामना खेळवण्यात येत आहे. कर्णधार एबीने या सामन्यात ओपनिंगला येत पहिल्या डावात झंझावाती खेळी करत शतक पूर्ण केलं. एबीला ब्रेट ली आणि पीटर सिडलसारखे गोलंदाजही रोखू शकले नाहीत.
एबीला गेल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध खेळता आलं नाही. त्यामुळे एबीच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तान चॅमियन्स टीमने 25 जुलैला दक्षिण आफ्रिकेवर 31 धावांनी मात केली होती. एबीने त्याआधी 24 जुलैला इंग्लंड चॅम्पियन्स विरुद्ध शतक झळकावलं होतं. एबीने अवघ्या 41 चेंडूचा सामना करत 100 धावांचा टप्पा गाठला होता. मात्र आता एबीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडच्या तुलनेत 2 चेंडूंआधी शतक पूर्ण केलं. एबीने चौकार ठोकत 39 चेंडूत शतक झळकावलं.
एबीकडून कांगारुंची धुलाई
एबीने या सामन्यात शतकानंतर आणखी 23 धावा जोडल्या. मात्र त्यानंतर पीटर सीडल याने एबीच्या खेळीला ब्रेक लावला. एबीने फक्त 46 चेंडूत 267.39 च्या स्ट्राईक रेटने 123 धावांची खेळी केली. एबीने या खेळीत 8 षटकार आणि 15 चौकार लगावले. एबी व्यतिरिक्त जेजे स्मट्स याने 53 चेंडूत 85 धावांची खेळी केली. जेपी ड्युमिनी याने 9 बॉलमध्ये 2 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 16 रन्स केल्या. मात्र इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मात्र त्यानंतरही दक्षिण आफ्रिका धावांचा डोंगर उभारण्यात यशस्वी ठरली. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 241 धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया 242 धावा करुन विजय मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.