मोठी बातमी! ४०.२८ लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद, 'या' महिलांना १५०० नव्हे दरमहा मिळणार ५०० रूपयेच; १६,५८७ 'या' लाभार्थींकडून वसूल होणार रक्कम, अपात्र कोण? वाचा...
esakal July 28, 2025 04:45 PM

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची प्रत्येक निकषांनुसार पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत ४० लाख २८ हजार महिला लाभासाठी अपात्र ठरल्या आहेत. याशिवाय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील सुमारे १४ लाख महिला शेतकरी, ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांचा लाभ दरमहा एक हजार रुपयांनी कमी केला आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे, त्या महिलांच्या नावापुढे ‘एफएससी’ (फायनान्शियल स्ट्राँग कंडिशन) असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी १ जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी अर्ज केले, त्यांना सरसकट काही महिने लाभ देण्यात आला. पण, योजनेचे निकष कडक असताना देखील अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आले. त्यामुळे मागील पाच महिन्यांत लाभार्थींची पडताळणी करून अपात्र लाभार्थींचा शोध घेण्यात आला आहे.

त्यानुसार १४ हजार २९८ पुरूष लाभार्थी, दोन हजार २८९ सरकारी महिला, संजय गांधी निराधार योजनेतील दोन लाख ३२ हजार महिला, ६५ वर्षांवरील एक लाख १० हजार महिला, एका कुटुंबातील चार लाख महिला आणि चारचाकी वाहन असलेल्या सव्वादोन लाख महिला या योजनेचा लाभ घेत होत्या हे पडताळणीतून स्पष्ट झाले. याशिवाय एक लाख ६० हजार महिलांनी स्वतःहून लाभ नाकारला. तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेतील महिला शेतकरी लाडकी बहीण योजनेत होत्या. त्यांचाही शोध घेऊन त्यांना लाडकी बहीणमधून दरवर्षी १८ हजारांऐवजी सहा हजार रुपयेच मिळणार आहेत.

अपात्र लाभार्थींच्या नावापुढे ‘एफएससी’ शेरा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दोन महिन्यांपासून बंद झाला आहे, त्यामागील कारण काय, अशी विचारणा शेकडो महिला फोनवर, अर्जाद्वारे करीत आहेत. पण, योजनेच्या निकषांनुसार पात्र महिला लाभार्थींचा लाभ बंद झालेला नाही. आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असतानाही योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या नावापुढे ‘एफएससी’ असा शेरा दर्शविला आहे. त्यांनाही आता लाभ मिळणार नाही.

- रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

योजनेची सुरवातीची अन् सद्यःस्थिती

  • एकूण लाभार्थी

  • २.५९ कोटी

  • दरमहा लागणारी रक्कम

  • ३,८८५ कोटी

  • सुरवातीची तरतूद

  • ४६,००० कोटी

  • पडताळणीअंती पात्र लाभार्थी

  • २ कोटी

  • दरमहा अपेक्षित रक्कम

  • ३,००० कोटी

  • आताची तरतूद

  • ३६,००० कोटी

‘या’ लाभार्थींकडून होणार वसुली

योजनेचे निकष डावलून १४ हजार २९८ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. याशिवाय दोन हजार २८९ सरकारी नोकरदार महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याची बाब पडताळणीतून समोर आली. या अपात्र लाभार्थींनी दरमहा २.४९ कोटींचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून लाभाची रक्कम वसूल होऊ शकते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.