मजदूर संघाच्या वतीने गौरव यात्रा
कल्याण (वार्ताहर) ः भारतीय मजदूर संघाने स्थापनेची सत्तर वर्षे पूर्ण केलेली आहेत. भारतीय मजदूर संघाचा ७० वर्षांचा हा स्वर्णिम प्रवास संपूर्ण देशभर साजरा होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशभर गौरव यात्रेचे आयोजन केलेले आहे. भारतीय मजूर संघ ठाणे जिल्ह्याच्या वतीने कारगिल विजय दिवशी शनिवारी (ता. २६) या गौरव यात्रेचे डोंबिवलीमध्ये आयोजन केले होते. संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
मजदूर संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मोहन येनुरे, मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री किरण मिलगीर, प्रदेश कोषाध्यक्ष ॲड. बाळासाहेब कांबळे, घरेलू कामगार संघ प्रदेश कार्याध्यक्ष शोभा अंबरकर, बेबीनंदा कांबळे, विविध संघटनांचे पदाधिकारी गौरव यात्रेमध्ये सहभागी झाले होते. लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून ही रॅली सुरू होऊन ती छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी येऊन थांबली.