ENG vs IND : इंग्लंड-इंडिया पाचव्या कसोटीतून दुखापतीमुळे कर्णधार आऊट, टीमला मोठा झटका
GH News July 30, 2025 07:13 PM

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पाचव्या आणि अंतिम सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. उभयसंघातील पाचवा सामना हा लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे 31 जुलैपासून होणार आहे. यजमान इंग्लंडने या पाचव्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. या सामन्याआधी इंग्लंडला मोठा झटका लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे पाचव्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे इंग्लंडला मोठा झटका लागला आहे. बेन स्टोक्सच्या दुखापतीबाबतची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.

स्टोक्सला नक्की काय झालं?

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात खेळवण्यात आला. बेन स्टोक्स याला या सामन्यातील तिसर्‍या दिवशी दुखापत झाली. त्यामुळे स्टोक्स रिटायर हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. मात्र त्यानंतर स्टोक्सने कमबॅक केलं आणि शतक झळकावत इंग्लंडला 669 धावांपर्यंच पोहचवत पहिल्या डावात 311 धावांची आघाडी मिळवून दिली. स्टोक्सला या खेळीदरम्यान त्रास जाणवत होता. मात्र स्टोक्सने देशासाठी आणि टीमसाठी दुखापतीकडे दुर्लक्ष करत खेळावर लक्ष केंद्रीत केलं. त्याचाच फटका स्टोक्सला बसलाय. स्टोक्सला खांद्याच्या दुखापतीमुळे अंतिम कसोटीतून बाहेर व्हावं लागलंय.

स्टोक्सने चौथ्या कसोटीत इंग्लंडसाठी 141 धावा केल्या. स्टोक्सने 2 वर्षांनंतर कसोटी शतक झळकावलं. स्टोक्सने त्याआधी पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. स्टोक्स यासह एकाच सामन्यात 5 विकेट्स घेण्यासह शतक करणारा इंग्लंडचा पहिला कर्णधार ठरला होता. तसेच स्टोक्सला या दुखापतीमुळे चौथ्या दिवशी बॉलिंग करता आली नाही. त्यावरुनच स्टोक्स पाचव्या सामन्यातून बाहेर होणार, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होती. शेवटी तसंच झालं आणि स्टोक्सला आता बाहेर व्हावं लागलं.

स्टोक्सची झुंज मात्र सामना अनिर्णित

स्टोक्सने चौथ्या सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंगने उल्लेखनीय कामगिरी केली. स्टोक्सने पहिल्या डावात 141 धावा केल्या. तर पहिल्या आणि दुसऱ्या डावात मिळून एकूण 6 भारतीय फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच 311 धावांची आघाडी असल्याने इंग्लंडला विजयाची आशा होती. मात्र भारताने ही आघाडी फोडून काढली आणि 100 पेक्षा जास्त धावा केल्या. त्यामुळे स्टोक्सची ही खेळी भारताच्या झुंजीसमोर व्यर्थ ठरली. मात्र स्टोक्सला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.