रोज चालणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. निरोगी राहण्यासाठी दररोज 10,000 चालण्याचा सल्ला दिला जातो. मात्र आता याबाबत एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये रोज फक्त 7000 पावले चालणे हे आरोग्यासाठी पुरेसे असल्याचे म्हंटले आहे. विशेष म्हणजे तुम्ही रोज 7000 पावले चाललात तर अनेक गंभीर आजारांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो.
अहवाल काय?
द लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलने एक अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये दररोज 7000 पावले चालल्याने आपले शरीर निरोगी राहते. विशेष म्हणजे यामुळे मृत्यूचा धोका सुमारे 47% कमी होतो असे सांगण्यात आले आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. उच्च रक्तदाब (बीपी) कमी होतो आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते असे अहवालात सांगण्यात आले आहे.
हे आजार होतील दूर
या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, दररोज 7000 पावले चालल्याने हृदयरोग, कर्करोग सारखे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. हृदयरोगाचा धोका 25% कमी होतो. कर्करोगाचा धोका 37% कमी होतो. टाइप-2 मधुमेहाचा धोका 14% कमी होतो. नैराश्य 22% कमी होते.
7000 पावले कसे पूर्ण करावे?
एकाच वेळी 7000 पावले चालणे कठीण असू शकते, म्हणून तुम्ही थोड्या थोड्या वेळाने चालण्याचा प्रयत्न करावा. जसे की, सकाळी 20-30 मिनिटे चालावे म्हणजे 2000-3000 पावले पूर्ण होतील. दुपारी 15 मिनिटे चालण्याचा प्रयत्न केल्यास 1500-2000 पावले होतील. संध्याकाळी जेवणानंतर अर्धा तास चालावे. अशा प्रकारे तुम्ही दिवसातून 7000 पावले चालण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरेल.