rat30p11.jpg-
81001
चिपळूणः चिपळूण रेल्वे स्टेशन.
----------
चिपळूण रेल्वे स्थानकाला जंक्शनची गरज
कऱ्हाड मार्ग होण्याची अपेक्षा; २५ वर्षे लढा सुरूच
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३०ः कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अपघात किंवा बिघाड झाल्यास मुंबईतून गोवा आणि कर्नाटकमध्ये जाणाऱ्या रेल्वेंना मिरज जंक्शनमार्गे पाठवणे शक्य आहे. कोकण रेल्वेचा मार्ग मिरज जंक्शनला जोडण्यासाठी आधी चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्ग होण्याची आवश्यकता आहे. हा मार्ग झाल्यास चिपळूण जंक्शन म्हणून नावारुपास येईल. त्यानंतर येथून ‘रो-रो’ सेवा सुरू करणे सुद्धा शक्य होईल. कोकण रेल्वे पर्यायी मार्गाने राज्य आणि देशाला जोडली जाईल. संसदेच्या अधिवेशनात कोकणातील खासदारांनी हा प्रश्न उचलून धरण्याची ग्वाही दिली आहे. त्याला किती यश येते, हे पाहावे लागणार आहे.
मागील ४२ वर्षांपासून चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गाचा प्रश्न रखडला आहे. तो झाला तर कोकण रेल्वे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राशी जोडली जाईल. मुंबईतून कोकण रेल्वेमार्गे गोवा, केरळ आणि कर्नाटकात जाणाऱ्या रेल्वेंना दुसरा पर्याय नाही. या मार्गावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात एखादा अपघात झाल्यास रेल्वे महामंडळाला एकतर रेल्वे रद्द करावी लागते किंवा नजीकच्या स्थानकावर तास न् तास उभी करावी लागते. कोकण रेल्वेमार्गाचे अद्याप शंभर टक्के दुहेरीकरण झालेले नाही. या मार्गावर विशेष गाड्या सोडल्यानंतर नियमित गाड्यांना विलंब होतो. या सर्व समस्यांवर चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्ग हाच एकमेव उपाय आहे. कारण, मुंबईतून येणारी रेल्वे चिपळूणमार्गे कऱ्हाड आणि तेथून मिरज जंक्शनमार्गे अन्य राज्यांत सोडणे शक्य आहे.
चिपळूणला रेल्वेचे जंक्शन व्हावे आणि येथे ‘रो-रो’ची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी मागील २५ वर्षांपासून कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीतर्फे पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्याला यश आलेले नाही. खेर्डी, खडपोली आणि लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होणारा माल ‘रो-रो’सेवेच्या माध्यमातून रत्नागिरीला पाठवावा लागतो. चिपळूण, संगमेश्वर, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड तालुक्यांसाठी लागणारे सिमेंट, आलिशान वाहने, जीवनावश्यक वस्तू, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे ट्रक प्रथम रत्नागिरी येथे येतात आणि तेथून पुढे पाठवले जातात. त्यामुळे नाहक भुर्दंड बसतो. त्यामुळे चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्ग झाल्यास कोकण रेल्वे संपूर्ण महाराष्ट्र आणि राज्याशी पर्यायी मार्गाने जोडला जाईल.
कोट
कोकण रेल्वेचा प्रकल्प साकारताना वालोपे, पेढे, परशुराम भागातील शेतकऱ्यांची अतिरिक्त जमीन घेण्यात आली. त्या वेळी शेतकऱ्यांनी जाब विचारल्यानंतर भविष्यात येथे जंक्शन करता येईल, ‘रो-रो’ची सुविधा उपलब्ध करता येईल. तसेच कोकण रेल्वेचा दुहेरी मार्ग झाल्यास अतिरिक्त जमिनीची आवश्यकता भासेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले; मात्र मागील ४० वर्षांत कोणताही प्रकल्प रेल्वेने घेतला नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. यातील अनेकांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे कोकण रेल्वेने स्थानिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
- रवींद्र तांबिटकर, माजी सरपंच, वालोपे