मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेणे गरजेचे
अभिनेत्री चिन्मयी सुमित यांचे मत
शिवडी, ता. ३० (बातमीदार) ः पालकांनी आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण द्यावे, असे संशोधनाअंती खरे ठरले आहे, असे मत सिने-नाट्य अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी व्यक्त केले. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागामार्फत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
उच्चभ्रू लोकांकडून मराठी टिकवण्याची आशा कमी असली तरी मध्यमवर्गीय लोक मात्र मराठी भाषा टिकवून ठेवतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. इंग्रजी बोलता येण्यासाठी इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेण्याची गरज नसून, मराठी माध्यमात शिकल्यानंतरही आपण इंग्रजी बोलू शकतो, असेही त्या पुढे म्हणाल्या.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या कामाचा पसारा दिवसेंदिवस वाढत असल्याचे सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी सांगितले. या संस्थेने मला घडवले असून, मंडळ हे एक विद्यापीठ आहे, असे गौरवोद्गार पालव यांनी काढले. तसेच शिक्षणापेक्षा आजच्या काळात सुशिक्षित आणि सुसंस्कृत होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन इंडोको रेमिडीजच्या व्यवस्थापकीय संचालिका अदिती कारे पाणंदीकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक, कला, क्रीडा पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांचा गौरव तसेच शालान्त परीक्षेत मंडळातून सर्वप्रथम आलेल्या हितेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळप्रमुख विकास शिंदे, मान्यवरांचा परिचय उपमंडळ प्रमुख नरेश विचारे, आभार सहमंडळ प्रमुख सुधीर फके आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षणप्रमुख संकेत शिर्के आणि वेद गावडे यांनी केले.