Donald Trump : भारत-रशिया मैत्रीवरुन ट्रम्प यांचा इतका जळफळाट की नको ते बोलले
GH News August 01, 2025 02:10 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 25 टक्के टॅरिफ लावण्याच्या घोषणेनंतर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. संसदेतून अमेरिकेला कठोर संदेश देण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर दबाव टाकत आहेत. भारतासोबत त्यांना व्यापार वाढवायचा आहे. यासाठी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प F-35 विकत घेण्यासाठी भारतावर दबाव टाकतायत. F-35 ची किंमत आणि कमतरता यामुळे भारत हे फायटर जेट विकत घेण्यासाठी अजिबात इच्छुक नाहीय. F-35 च्या तुलनेत भारताकडे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीमागे भारतावर अमेरिकन शस्त्र विकत घेण्याचा दबाव टाकण्याचा उद्देश आहे. ट्रम्प यांनी अप्रत्यक्षरित्या धमकी दिली आहे. भारताने F-35 किंवा अन्य अमेरिकी शस्त्र विकत घ्यावी, अन्यथा अमेरिकेला पाकिस्तानला मदत करेल.

राष्ट्रीय हित सुरक्षित ठेवणं आणि पुढे जाण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलली जातील” असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल संसदेत म्हणाले आहेत. “मोदी सरकार शेतकरी, श्रमिक, निर्यातदार, MSME तसच उद्योग जगताचं संरक्षण आणि संवर्धनाला सर्वोच्च महत्त्व देते” असं गोयल यांनी स्पष्ट केलय.

‘पाकिस्तानात तेल शोधण्यासाठी त्यांना शुभेच्छा’

25 टक्के टॅरिफ आणि दंड ही सौदेबाजीची रणनिती असू शकते असं काँग्रेस खासदार शशी थरुर म्हणाले. चांगला सौदा होत नसेल, तर आपल्याला मागे हटावं लागू शकतं, असं थरुर म्हणाले. “अमेरिका तेल भंडार विकसित करण्यासाठी पाकिस्तानसोबत काम करणार आहे. पाकिस्तानात तेल शोधण्यासाठी त्यांना शुभेच्छा” असा उपरोधिक टोला थरुर यांनी लगावला. “ट्रम्प यांची वक्तव्य ही सौदेबाजीची रणनिती असू शकते. कारण तुम्हाला माहितीय व्यापार कराराची चर्चा सुरु आहे. व्यापार करार झाला नाही, तर निश्चितच आपल्या निर्यातीला नुकसान होईल. कारण अमेरिका भारतासाठी एक मोठा बाजार आहे” असं थरुर म्हणाले.

‘याची मला फिकिर नाही’

“सर्वकाही ठीक नाहीय, म्हणून भारताला 25 टक्के शुल्क आणि रशियाकडून खरेदीसाठी दंड भरावा लागेल. भारत आमचा मित्र आहे. पण मागच्या काही वर्षात त्यांच्याबरोबर आमचा अपेक्षेपेक्षा कमी व्यापार झाला आहे. कारण त्याचं शुल्क अधिक आहे. जगात सर्वाधिक शुल्क ते आकारतात” असं ट्रम्प म्हणाले.

“त्याशिवाय भारताने रशियाकडून सैन्य उपकरणे आणि तेल खरेदी तेव्हा केलीय, जेव्हा सर्वांची इच्छा अशी आहे की, रशियाने युक्रेनमध्ये हत्या बंद केल्या पाहिजेत. भारत आणि रशियामध्ये जवळचे संबंध आहेत, त्यावरही ट्रम्प यांनी हल्लाबोल केला. दोन्ही देश आपली डेड इकोनॉमी एकत्र खोलात नेऊ शकतात. भारत-रशिया काय करतात याची मला फिकिर नाही” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.