राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि जळगाव महापालिकेचे नगरसेवक असलेले अनंत जोशी यांनी आत्महत्या केली आहे. अनंत जोशी यांनी ओंकारेश्वर मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक तसेच महापालिकेचे गटनेते सुद्धा होते. अनंत जोशी यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आत्महत्येच्या या घटनेमुळे जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
दहा दिवसांपूर्वीच म्हणजे 21 जुलै रोजी अनंत जोशी यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता, अशी माहिती समोर येत आहे, त्यानंतर त्यांनी आज टोकाचं पाऊल उचललं आहे. जोशी यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांसह वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे.
शिवसेना एकत्र असताना जोशी शिवसेनेत होते, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेतून उठाव केला. शिवसेनेचे दोन गट पडले, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट. अनेक दिग्गज नेत्यांनी त्यावेळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर अनंत जोशी आहे तिथेच राहिले, मात्र अलिकडच्या काळात ते शिवसेना ठाकरे गटात देखील सक्रिय नव्हते अशी माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनंत जोशी हे काही तरी विवंचनेत होते, मात्र ते असं काही टोकाचे पाऊल उचलतील असं वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन लढ्ढा यांनी यावेळी बोलताना दिली आहे.दरम्यान जोशी यांनी आत्महत्या का केली? नेमकं काय कारण होतं? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या घटनेमुळे जळगावमध्ये हळहळ व्यक्त होत आहे, रुग्णालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.