West Indies Vs Pakistan: अखेरच्या चेंडूवर वेस्ट इंडीजचा विजय; पाकिस्तानवर दोन विकेट राखून मात, टी-२० मालिकेत १-१ बरोबरी
esakal August 04, 2025 04:45 PM

लॉडरहिल : वेस्ट इंडीजने रविवारी पाकिस्तान संघावर दोन विकेट राखून रोमहर्षक विजय मिळवला. जेसन होल्डरने शाहीन शाह आफ्रिदी टाकत असलेल्या अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर चौकार मारत यजमान वेस्ट इंडीज संघाला थरारक विजय मिळवून दिला व तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. १९ धावा देत चार फलंदाज बाद करणारा व नाबाद १६ धावांची खेळी साकारणारा जेसन होल्डर सामन्याचा मानकरी ठरला.

पाकिस्तानकडून वेस्ट इंडीज संघासमोर १३४ धावांचे आव्हान विजयासाठी ठेवण्यात आले. एलिक ॲथानेज (२ धावा), ज्वेल अँड्रयू (१० धावा), शेरफेन रुदरफोर्ड (९ धावा) यांच्याकडून निराशा झाली. शाई होप याने ३० चेंडूंमध्ये २१ धावांची खेळी साकारत विजयासाठी प्रयत्न केले; मात्र मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यानंतर रोस्टन चेस (१६ धावा) व गुदाकेश मोती (२८ धावा) यांनी वेस्ट इंडीजसाठी मोलाची कामगिरी बजावली. सईम अयुबने चेसला बाद केले. मोती धावचीत बाद झाला.

वेस्ट इंडीज संघासमोर अखेरच्या दोन षटकांमध्ये विजयासाठी २४ धावांची गरज होती. हसन अली टाकत असलेल्या १९व्या षटकात १६ धावा वसूल करण्यात आल्या. यामध्ये रोमारियो शेफर्डने मारलेल्या एक षटकार व एक चौकार याचा समावेश होता. अखेरच्या षटकात विजयासाठी आठ धावांची आवश्यकता होती. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शेफर्ड बाद झाला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी तीन धावांची आवश्यकता असताना होल्डरने चौकार मारून वेस्ट इंडीजला नेत्रदीपक विजय मिळवून दिला.

याआधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. जेसन होल्डरने सईम अयुब, साहिबजादा फरहान, हसन नवाज व मोहम्मद नवाज या फलंदाजांना १९ धावांच्या मोबदल्यात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पाकिस्तानकडून सलमान आगा (३८ धावा) व हसन नवाज (४० धावा) यांनाच थोडाफार प्रतिकार करता आला. पाकिस्तानने २० षटकांमध्ये नऊ बाद १३३ धावा केल्या.

Pakistan WCL Exit: WCL मधून पाकिस्तानला हाकलले! भारताचा विरोध अन् आयोजकांचा निर्णय

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान- २० षटकांत नऊ बाद १३३ धावा (फखर जमान २०, सलमान आगा ३८, हसन नवाज ४०, जेसन होल्डर ४/१९, गुदाकेश मोती २/३९) पराभूत वि. वेस्ट इंडीज- २० षटकांत आठ बाद १३५ धावा (शाई होप २१, रोस्टन चेस १६, गुदाकेश मोती २८, जेसन होल्डर नाबाद १६, रोमारियो शेफर्ड १५, मोहम्मद नवाज ३/१४).

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.