तात्या लांडगे
सोलापूर : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आज (ता. ४) सकाळी आठ वाजल्यापासून मंगळवारी (ता. ५) सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत प्राधान्यक्रम बदलण्याची व अर्जात दुरुस्ती करण्याची शेवटची संधी मिळणार आहे. ओपन टू ऑल ही प्रवेश फेरी राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी असणार आहे. ६ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील नऊ हजार ५२२ कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला आहे. त्याठिकाणी २१ लाख ५० हजार ४७९ इतकी प्रवेश क्षमता आहे. पण, चौथ्या प्रवेशफेरीअखेर राज्यातील १४ लाख ३८ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. २ ऑगस्टपर्यंत प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यात आठ लाख ८२ हजार ८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. अजूनही १२ लाख ६८ हजार ३९८ जागा रिक्तच आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील देखील १८ हजारांहून अधिक जागा आहेत.
आता या विद्यार्थ्यांसाठी खुली प्रवेश फेरी राबविली जाणार आहे. यात पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकणार आहेत. त्यांना पसंतीच्या महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरावा लागणार आहे. ६ ऑगस्टला ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या बाबी...
जुलै २०२५ च्या राज्य मंडळ संलग्नित मंडळाचे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज भरता येईल
यापूर्वी अर्ज भरलेल्यांना अर्जातील भाग एक व भाग दोन पुन्हा भरता येणार आहे
ओपन टू ऑल फेरीत अर्जाच्या भाग- एकमध्ये आवश्यकतेनुसार बदल करता येईल. प्राधान्यक्रम देखील बदल करता येईल.
अद्याप प्रवेशासाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनाही नव्याने नोंदणी व प्राधान्यक्रम भरता येणार आहे
...तर पाच हजारांवर शिक्षक होतील अतिरिक्त
ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्या होऊनही साडेबारा लाखांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. अनेक महाविद्यालयांना पटसंख्येच्या अपेक्षित विद्यार्थी मिळालेले नाहीत. सप्टेंबरच्या पटसंख्येवर (आधारव्हॅलिड विद्यार्थी) २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता होणार आहे. अपेक्षित प्रवेश न मिळाल्याने अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे पाच हजारांवर शिक्षक अतिरिक्त होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सलग तीन वर्षे अशीच स्थिती राहिल्यास तेथील तुकड्यांची मान्यता रद्द होते. तत्पूर्वी, प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झालेल्या महाविद्यालयांची पडताळणी केली जाणार आहे.