लंडन : पहिल्या कसोटीत मोठ्या पराभवाचा सामना केल्यानंतर बर्मिंगहॅम येथील दुसऱ्या कसोटीत आम्ही उलटवार केला आणि दणदणीत विजय मिळवला होता. फलंदाजी आणि गोलंदाजीत एकाच वेळी अचूक कामगिरी केली तर इंग्लंडला पराभूत करता येऊ शकते, हा विश्वास आम्हाला तेथेच मिळाला, असे मत भारतीय कर्णधार शुभमन गिल याने व्यक्त केले.
संघातील खेळाडूंमध्ये ऊर्जा होती. निवड केलेल्या प्रत्येक खेळाडूला संघासाठी कमाल कामगिरी करून दाखवायची तीव्र इच्छा होती आणि प्रत्येकाने संधी मिळताच आपले सर्वस्व दिले, असे गिल म्हणाला.
कप्तान म्हणून मी सतत संघाचा विचार केला. परदेश दौऱ्यात माझी कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. या मालिकेत मला संघातील सर्वोत्तम फलंदाज व्हायचे होते. मैदानावर किंवा मैदानाबाहेर सतत संघाचा आणि सहकाऱ्यांचा विचार करत असल्याने मला दडपण जाणवले नाही. कारण मी स्वतःचा विचारच करत नव्हतो, असेही गिलने नमूद केले.
सिराज कधीही हार न मानणाराखेळाडूंनी संघाच्या हाकेला दिलेला प्रतिसाद काम करून गेला. सिराजबद्दल सगळ्यांना प्रचंड प्रेम आणि आदर आहे. तो कधीही हार न मानणारा गोलंदाज आहे. चांगला मारा करूनही त्याला अपेक्षित यश मिळत नव्हते, याचे वाईट वाटत असताना त्याने तयार केलेल्या दडपणाचा फायदा इतर गोलंदाजांना होत होता. अखेरच्या सामन्यात अखेरच्या निर्णायक क्षणात त्याने केलेला मारा काय परिणाम साधून गेला हे सर्वांनी अनुभवले, असे सिराजचे तोंडभरून कौतुक करताना गिल म्हणाला.