Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादव कॅप्टन, 3 सामने-15 खेळाडू, आशिया कपसाठी भारताचा संभाव्य संघ
Tv9 Marathi August 07, 2025 10:45 AM

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी 26 जुलै रोजी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी एसीसीने या स्पर्धेतील संपूर्ण सामने हे कोणत्या 2 स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार हे देखील जाहीर करण्यात आलं. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 28 सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कप स्पर्धेसाठी ऑगस्टमधील तिसर्‍या आठवड्यात बीसीसीआय निवड समितीकडून भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. ही स्पर्धा टी 20i फॉर्मेटने होणार असल्याने सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार हे निश्चित आहे.

कुणाला मिळणार कमबॅकची संधी?

सूर्यकुमार यादव याची टी 20i वर्ल्ड कप फायनलनंतर पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. सूर्या आयपीएल 2025 नंतर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर आता पूर्णपणे फिट आहे. या स्पर्धेत ओपनर म्हणून अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल या तिघांना संधी मिळू शकते.

अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांच्यावर मिडल ऑर्डरची धुरा असेल, हे निश्चित म्हटलं जात आहे. तसेच फिनिशर रिंकु सिंह याला संधी दिली जाऊ शकते. श्रेयस अय्यर याचं कमबॅक होऊ शकतं. श्रेयसने अखेरचा टी 20i सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध डिसेंबर 2023 साली खेळला होता.

संजू की ईशान?

ऋषभ पंत हा मुख्य विकेटकीपर असू शकतो. तर पर्यायी विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि ईशान किशन या दोघांपैकी कुणाला संधी मिळते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. ईशान टी 20i संघातून गेली अनेक महिने दूर आहे. त्यामुळे ईशानला संजूच्या तुलनेत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

वेगवान गोलंदाज म्हणून कोण?

ऑलराउंडर हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल या तिघांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव याचा समावेश केला जाऊ शकतो. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज या तिघांपैकी इतर कुणाला संधी मिळले अशी शक्यता फार कमी आहे.

भारताचं साखळी फेरीतील वेळापत्रक

विरुद्ध यूएई, 10 सप्टेंबर, दुबई

विरुद्ध पाकिस्तान, 14 सप्टेंबर, दुबई,

विरुद्ध ओमान, 19 सप्टेंबर, अबुधाबी

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ : शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत , रिंकू सिंह, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, ईशान किशन/संजू सॅमसन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.