Sudhir Mungantiwar : भाजप म्हणजे शनिशिंगणापूर नव्हे; मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या कार्यकर्त्यांच्या भावना
esakal August 06, 2025 05:45 PM

नाशिक: भारतीय जनता पक्ष म्हणजे शनिशिंगणापूर नव्हे, पक्षाचे दरवाजे सर्वांसाठी खुले नको. अन्य पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश देताना स्थानिकांना विश्वासात घेतले जात नाही, त्यामुळे कार्यकर्ते नाराज होतात, असे सांगत पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपला ‘घरचा आहेर’ दिला आहे. मात्र, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याची सारवासारवही त्यांनी केली.

श्री. मुनगंटीवार सोमवारी श्री त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, की अन्य पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश घेताना तालिकांना विश्वासात घेतले जात नसल्याने कार्यकर्ते नाराज होतात. भाजप म्हणजे शनिशिंगणापूर नव्हे, सर्वांसाठी पक्षाचे दरवाजे खुले नको ही माझी सूचना नाही, तर कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचे ते म्हणाले. मी त्र्यंबकेश्वराला जाऊन दर्शन घेतले.

मात्र, ते दर्शन मंत्रिपदासाठी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेल्या निकालाचे मुनगंटीवार यांनी स्वागत केले. न्यायालयाच्या निर्णयामुळे आरक्षण काढताना शिल्लक जागेवरही ओबीसी आरक्षण मिळणार असल्याने त्याचा फायदा ओबीसींना होईल. त्यामुळे न्यायालयाने आरक्षणासंदर्भात जो काही निकाल दिला आहे, त्याची निवडणूक आयोग अंमलबजावणी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. न्यायालयाच्या निकालामुळे आता तत्काळ निवडणुका होणे आवश्यक आहे.

निवडणुका नसल्याने त्याचे नकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. राज्यात एका आयुक्ताचे बेहिशेबी मालमत्ता प्रकरण समोर आले असून, त्याच्याकडे जवळपास एक हजार कोटींची मालमत्ता सापडली. लोकप्रतिनिधींचा अंकुश नाही. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचा दावाही त्यांनी केला.

Election News : दिवाळीनंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात

ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा परिणाम नाही

कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, या राज ठाकरे यांच्या विधानात गैर असे काही नाही. राज व उद्धव एकत्र आले तरी दूरदूरपर्यंत भाजपचे नुकसान होणार नाही. जोपर्यंत आम्ही चांगले काम करू, तोपर्यंत जनता आमच्या सोबत असल्याचे ते म्हणाले. पुण्यातील घटनेत गुन्हा नोंद होत नाही, ही चिंतेची बाब असून यासंदर्भात चिंतन करणे आवश्यक असल्याचे सांगताना मुनगंटीवार यांनी स्वपक्षाला ‘घरचा आहेर’ दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.