जून महिन्यात इराण आणि इस्रायलमध्ये 12 दिवस युद्ध चाललं. यात इराणचे अनेक न्यूक्लियर वैज्ञानिक आणि सैन्य कमांडर्सची हत्या झाली. इस्रायलने आधीच इराणमध्ये आपले हेर तैनात केले होते. त्यांनी युद्धादरम्यान इराणची संरक्षण प्रणाली कमजोर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या ऑपरेशनच श्रेय मोसादला दिलं जातय. मोसादने इराणच्या सुरक्षा व्यवस्थेत आपण जाळं उभारल्याचं बोललं जात. युद्ध संपल्यानंतर इराणमध्ये अनेकांना इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशी दिली जात आहे. अलीकडेच रूजबेह वादी नावाच्या व्यक्तीला मोसादसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन इराणमध्ये फाशी देण्यात आली. इस्रायल इराणी लोकांना मोसादच एजंट बनवत आहे, असं इराणी न्याय पालिकेने म्हटलं आहे.
बीबीसीच्या एका बातमीनुसार, वर्ष 2011 मध्ये तीन इराणी अणूवैज्ञानिक अब्दुलहमीद मिनूचेहर, अहमदरेजा जोल्फगारी दरियानी आणि रूजबेह वादी यांनी 18 व्या अणूऊर्जा सम्मेलनात एक संयुक्त शोधपत्र सादर केलं. चौदावर्षानंतर आता तिघेही या जगात नाहीत. दोघांची हत्या इस्रायलने केली. एकाला इराणने फाशी दिली.
युद्धाच्या पहिल्या तासाभरात इस्रायलने काय केलेलं?
13 जूनच्या सकाळी इराणवर हल्ला केल्यानंतर पहिल्या तासाभरात इस्रायलने मिनूचेहर आणि जोल्फगारी यांना संपवलं. त्यानंतर सात आठवड्यांनी रूजबेह वादीला 5 ऑगस्टच्या सकाळी मोसादसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली. फाशीच्या घोषणेनंतर इराणी टीव्हीवरील एका कार्यक्रमात रूजबेहवादीला एका व्हिडिओमध्ये गुन्हा कबूल करताना दाखवलं. त्याने मान्य केलं की, मोसादला एका अणवस्त्र केंद्राशी संबंधित माहिती दिली होती. इस्रायलने युद्धात त्या अणवस्त्र केंद्राला टार्गेट केलं आणि एका इराणी अणवस्त्र वैज्ञानिकासंदर्भात सुद्धा माहिती दिलेली.
मोसाद कशाप्रकारे एजंट्स बनवते?
रूजबेह वादीने मोसादशी वर्चुअल सोशल नेटवर्कच्या माध्यमातून संपर्क साधला, असा इराणी न्यायपालिकेचा दावा आहे. त्यानंतर ट्रेनिंग कोर्सच्या बहाण्याने तो विएनाला गेला. तिथे तो मोसादच्या अधिकाऱ्यांना पाचवेळा भेटला. न्यायपालिकेच्या स्टेटमेंटमध्ये अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर नाहीयत. वादी कितीकाळ ताब्यात होता? इराणी ह्यूमन राइट्स ऑर्गनायजेशननुसार, 2024 च्या फेब्रुवारीच्या आसपास त्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो जेलमध्ये होता.