मत चोरीच्या आरोपांनी देश सध्या ढवळून निघाला आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मत चोरींचे सादरीकरण करून एकच खळबळ उडवून दिली. आरोप करुनच ते थांबले नाही तर त्यांनी अनेक सज्जड पुरावेच सादर केले. त्यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. नागपूर येथे पत्रकार परिषदेत पवारांनी जो दावा केला त्याने राज्यातीलच नाही तर देशाच्या राजकारणात भूकंप येण्याची शक्यता आहे.
160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी
नागपूर येथील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विविध मुद्यांवर थेट उत्तरं दिली. ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. त्यांनी मत चोरीची शक्यता वर्तवली. राहुल गांधी यांनी मुद्देसुद्दपणे या मुद्यावर बाजू मांडल्याचे स्पष्ट करत निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करण्याची आणि सविस्तर उत्तर दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
त्याचवेळी त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली होती. ही 2 माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते. 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यांच्या या बॉम्बने आता मत चोरीच्या आरोपांचे गांभीर्य वाढवल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ही माणसं येऊन मला 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होती. पण त्यावेळी निवडणूक आयोग या संस्थेविषयी माझ्या मनात कोणताही संशय नव्हता. राजकारणात असे लोक भेटत असतात. त्यामुळे त्यावेळी मी त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं. हे झाल्यानंतर त्या लोकांची राहुल गांधी यांची भेट झाली. पण त्यावेळी राहुल गांधी आणि माझे मत असे काही करणे योग्य नाही. हा आपला रस्ता नाही, आपण लोकांकडे जाऊन आणि त्यांचे आशिर्वाद मिळवू असा निर्णय आम्ही घेतला, असे शरद पवार यांनी सांगितले.
ते 2 लोक कोण?
आता शरद पवार आणि राहुल गांधी यांना भेटणाऱ्या त्या दोन व्यक्ती कोण याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दोन माणसांनी पवारांना आणि राहुल गांधी यांना नेमकी काय ऑफर दिली. ही माणसं कोण होती, त्यांचा निवडणूक आयोग अथवा मतदान प्रक्रियेशी काय संबंध होता का? असे आणि अनेक प्रश्न आता विचारल्या जात आहे. मात्र राहुल गांधी यांच्यानंतर शरद पवार यांनी इतक्या उशीरा का असेना केलेल्या या खुलाशाने राजकारणात बॉम्ब पडला हे नाकरून चालणार नाही.