नुकताच संजय राऊत यांनी दिल्लीतील बैठकीत काय घडले हे सांगितले आहे. संजय राऊत म्हणाले की, दोन बंधू मराठीच्या प्रश्नावर एकत्र येत असतील तर कोणाला काय समस्या असेल आणि याबद्दल दिल्लीमध्ये चर्चा करण्याचा काही विषय नाही. कारण स्थानिक पातळीवर दोन बंधू एकत्र येत आहेत. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत हा इंडिया आघाडीचा विषय नाहीये. परप्रांतीयांच्या विरोधात राज ठाकरे यांची कोणतीही भूमिका नाहीये. मराठी कोणी बोलणार नाही, म्हटल्यावर भडका उडतो.
ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल राऊतांचे मोठे विधान
पुढे संजय राऊत म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत महाविकास आघाडीत कोणालाही आक्षेप नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अद्याप कोणतीही आघाडी नाहीये. आम्ही दिल्लीत जातो, आम्ही आमच्या अटी -शर्यतीवर दिल्लीत जातो. कोणाची लाचारी पत्कारून आम्ही दिल्लीत जात नाहीत, हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. जो लाचारांचा गट होता, तो तुमच्यासोबत आहे, जे शेपट्या हालवत तुमच्यमागे दिल्लीत फिरतो. यामुळे फडणवीसांनी आम्हाला स्वाभिमानाचा विषय सांगू नये.
आमची कोणत्याही संघर्षासाठी तयारी
आमची कोणत्याही संघर्षासाठी तयारी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांनी एकाच कार्यक्रमाला वरळीत हजेरी लावली, यावेळी काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आमचे त्यावर लक्ष होते. पण आम्ही कोणत्याही संघर्षासाठी आता तयार आहोत, असे संजय राऊत यांनी म्हणत थेट मोठा इशाराच दिला आहे.
राऊतांनी केली देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका
निवडणूक आयोगाच्या विरोधातील आमचा लढा कायम राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले. आम्ही राहुल गांधी यांच्याकडून आशावादी आहोत, असेही त्यांनी म्हटले. यावेळी संजय राऊत हे दिल्ली बैठकीत काय काय घडले हे सांगताना देखील स्पष्टपणे दिसले. उद्धव ठाकरे यांना दिल्लीतील बैठकीत मागच्या रांगेत बसवल्याचे सांगत टिका केली जात आहे. याचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. त्यावरही राऊतांनी थेट भाष्य केले आणि मागच्या रांगेत बसण्याचे थेट कारण सांगितले.