निवडणूक प्रक्रियेवर पवारांनी शंका घेतली, आता फडणवीसांची खरपूस टीका, म्हणाले राहुल गांधींना भेटल्याचे…
Tv9 Marathi August 09, 2025 11:45 PM

Devendra Fadnavsi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासह इतरही राज्यांत निवडणुकीत घोळ झाला आहे, असा आरोप केला आहे. हे आरोप करताना त्यांनी काही पुरावेही सादर केले आहेत. त्यांच्या आरोपांनंतर आता खासदार शरद पवार यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. दोन माणसांनी मला आम्ही तुमच्या 160 जागा निवडून आणून देऊ. ते मला मतांमध्ये फेरफार करण्याबाबत सांगत होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. आता शरद पवार यांच्या मोठ्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींना भेटण्याचा हा परिणाम आहे, असं वाटतंय, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी शरद पावर यांचे नाव घेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम

शरद पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच अशा प्रकारची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले? राहुल गांधी जसे सलीम-जावेदच्या यांच्यासारख्या काल्पनिक कहाण्या तयार करतात तशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच राहुल गांधी सध्या ईव्हीएमवर बोलत होते. तरी शरद पवार त्यावर बोलत नव्हते. पवार साहेबांनी अनेकवेळा स्पष्टपणे भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देण हे अयोग्य आहे. आता अचानक अशाप्रकारे पवार साहेब बोलले आहेत. हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

शपथपत्र मागितलं तर तुम्ही का देत नाही?

कितीही संभ्रम निर्माण केला तरी ही भारतात ज्या पद्धतीने स्वतंत्र निवडणुका होतात, त्या इतरत्र कुठेही होत नाही. हे सर्वांनाच माहिती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व मंडळी जनतेत बोलतात. पण निवडणूक आयोगाने बोलावल्यावर कोणीही जात नाही, अशी टीका फडणवीस यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर केली. राहुल गांधी निवडणूक आयोगासमोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत. राहुल गांधी सांगतात की आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. शपथपत्र मागितलं तर तुम्ही का देत नाही? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलाय. तसेच ते खोटं बोलत आहेत. खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते. म्हणूनच रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे हे पळपुटे लोक आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, आता शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता भविष्यात या विषयावर नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.