83217
रुग्णहक्कांची अंमलबजावणी आवश्यक
डॉ. धनंजय काकडे ः कुडाळात जिल्हास्तरीय कार्यशाळेस प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः रुग्णहक्कांची अंमलबजावणी ही केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात यावी, यासाठी नागरिकांचा पुढाकार आणि प्रशासनाची सकारात्मक भूमिका महत्त्वाची आहे. या दोन्ही बाजू सक्रिय राहिल्या, तर रुग्णहक्कांचे खरे संरक्षण शक्य होईल, असे प्रतिपाद पुणे येथील साथी संस्थेचे डॉ. धनंजय काकडे यांनी केले.
‘रुग्णांचे हक्क व जबाबदाऱ्या’ या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा पंचायत समिती कुडाळ येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ले, मालवण, सावंतवाडी आदी तालुक्यांतील ५० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. सहभागी प्रतिनिधींमध्ये आशा, अंगणवाडी सेविका, बचतगट प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यशाळेत महिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रवीण गोरुले यांनी योजनेची माहिती दिली. कार्यक्रमात साथी संस्था पुणेचे डॉ. धनंजय काकडे, शकुंतला भालेराव आणि विनोद शेंडे यांनी मार्गदर्शन करत रुग्णहक्कांच्या मूलभूत बाबी, कायदेशीर तरतुदी आणि स्थानिक आरोग्य व्यवस्थेतील भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी सुनीता गांधी यांनी पार पाडली.
................
तक्रार निवारण कक्ष स्थापणार
तालुकानिहाय कृती गट तयार केले असून, हे गट तालुक्यातील खासगी रुग्णालयांना भेट देतील. रुग्ण हक्क सनद आणि दरपत्रकांची अंमलबजावणी प्रत्यक्ष पाहणी करून दस्तऐवजीकरण केले जाईल. जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती देण्यात आली.