रक्षाबंधनाला प्रत्येक घरात काही ना काही गोड पदार्थ हे बनवले जातात या रक्षाबंनाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत आणि झटपट बनवा खोबऱ्याचे लाडू.
किसलेलं खोबरं (ओलं किंवा सुकं): २ कप, दूध: १/२ कप, साखर: १ कप, वेलची पूड: १ चमचा, तूप: २ चमचे, काजू किंवा बदाम: आवश्यकतेनुसार (सजावटीसाठी)
हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत आणि कमी वेळेत तयार होतात. लाडू बनवण्याची कृती/ योग्य पद्धत जाणून घ्या.
एका जाड बुडाच्या कढईत तूप गरम करून घ्या. त्यानंतर गरम तुपात किसलेलं खोबरं घालून मंद आचेवर साधारण ५-७ मिनिटे हलकं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. खोबरं करपणार नाही याची काळजी घ्या.
भाजलेल्या खोबऱ्यामध्ये दूध घालून व्यवस्थित मिसळून घ्या. आता त्यात साखर घालून मिश्रण पूर्णपणे एकजीव होईपर्यंत ढवळत रहा.
मिश्रण सतत ढवळत रहा, जेणेकरून साखर पूर्णपणे विरघळेल आणि मिश्रण घट्ट होईल.
मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड घालून मिक्स करा. त्यानंतर मिश्रण लाडू वळण्याच्या स्थितीमध्ये आल्यावर गॅस बंद करा.
लाडूचे मिश्रण एका ताटात काढून थोडं थंड होऊ द्या. मिश्रण पूर्णपणे थंड होऊ देऊ नका. मिश्रण कोमट असताना, हाताला थोडं तूप लावून त्याचे छोटे-छोटे लाडू वळा. त्यानंतर प्रत्येक लाडूवर काजू किंवा बदामाचा तुकडा लावून सजवा.
अशा प्रकारे, तुमचे स्वादिष्ट खोबऱ्याचे लाडू तयार आहेत! हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यात साठवून ठेवू शकता.