काहीजणांना छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो. तो त्यांचा स्वभाव असतो किंवा सवय. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड, राग आणि चीड अनेकदा आपल्या नातेसंबंधांवर, कामावर आणि मानसिक शांतीवर परिणाम करते. अशा परिस्थितीत रागावर नियंत्रण मिळवणे काहीवेळेला कठीण जाते. पण मग राग नियंत्रणात आणण्यासाठी नेमका काय उपाय करावा हे लक्षात येत नाही. यासाठीच प्रेमानंद महाराजांनी काही उपाय सांगितले आहेत.
रागावर नियंत्रण कसे मिळवावे?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये संत श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज यांनी रागावर नियंत्रण कसे मिळवावे याबद्दल सांगितलं आहे. प्रवचनादरम्यान एका भक्ताने त्यांना विचारले, “महाराजजी, तुम्हाला खूप राग येतो का? छोट्या छोट्या गोष्टींवरही राग येतो का? याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि कामावर परिणाम होतो का?” यावर प्रेमानंद महाराज म्हणाले की, “राग केवळ समोरच्या व्यक्तीलाच जाळत नाही तर आपल्याला आतूनही जाळतो. जर तो वेळीच नियंत्रित केला नाही तर तो हिंसाचारात रूपांतरित होऊ शकतो आणि आयुष्यभर पश्चात्ताप देऊ शकतो.”
रागावरचा पहिला उपाय म्हणजे ….
महाराज म्हणाले, “हिंसाचार किंवा आक्रमकतेमुळे नेहमीच जीवितहानी होते. अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे एखादी व्यक्ती रागाच्या भरात एखाद्याला मारते आणि नंतर आयुष्यभर तुरुंगात सडते.” महाराजांच्या मते, रागावरचा पहिला उपाय म्हणजे तो टाळणे. ते म्हणाले, “जर समोरची व्यक्ती नकारात्मक गोष्टी बोलत असेल, तर सर्वोत्तम उपाय म्हणजे तिथून दूर जाणे. जेव्हा तुम्हाला वाटेल की परिस्थिती बिघडू शकते, तेव्हा तिथून दूर जा.
रागात जिंकण्याचा प्रयत्न करू नका
तसंच पुढे प्रेमानंद महाराज म्हणाले, “या परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. रागात जिंकण्याचा प्रयत्न करू नका, तर परिस्थितीपासून स्वतःला दूर ठेवून स्वतःला शांत करा. अन्यथा, राग त्याच्या पूर्ण स्वरूपात बाहेर येईल.जर आपण काहीही बोललो नाही तर राग आपल्याला आतून जाळून टाकेल, म्हणून शहाणपणाने असा नियम बनवणे चांगले की आपण रागवायचं नाही. मनात ठरवावे की आपण रागावणार नाही, हळूहळू तुम्हाला शक्ती मिळेल.”
विराट-अनुष्काला सांगितलेला उपाय
त्यांनी राग शांत करण्यासाठी एक आध्यात्मिक उपाय देखील सुचवला, तो म्हणजे नामाचा जप करणे. तुम्हाला आवडणाऱ्या देवाच्या नावाचा जप करा नक्कीच फरक जाणवू लागेल. नामाचा जप केल्याने हृदयातील गोंधळ शांत होतो त्यामुळे रागही शांत होतो.” हाच उपाय त्यांनी विराट-अनुष्कालाही सांगितला होता. नामजप हा उपाय फक्त रागात नाही तर मनातील गोंधळ दूर करण्यासाठीही फार लाभदायी मानला जातो.