राज्यात मराठा आंदोलनाची हलगी वाजली आहे. त्यापूर्वीच दिग्गज नेते शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय अनुभवाची चुणूक दाखवली. ओबीसी पॉलिटिक्सचा श्रीगणेशा त्यांनी नागपुरातून केला. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांनी भाजपच्या वोट बँकेला पहिला खो दिला. भाजपची मदार असलेल्या ओबीसी समाजाला पुन्हा पुरोगामी विचाराकडे आणण्याची खेळी यशस्वी होते का? नागपूर पुन्हा देशातील परिवर्तनाचे नांदी ठरते का, याची उत्तरं काळाच्या उदरात दडलेली आहे. पण पवारांनी ओबीसी कार्ड टाकलं आहे. त्यात आता इस्पिकचा हुकमी एक्का कोण टाकतो त्यावर पुढील राजकीय चाल ठरेल.
विधानसभा निवडणुकीत पाशवी बहुमताने महायुती सत्तेत दाखल झाली. आता भाजपासह शिंदे सेना आणि दादांच्या राष्ट्रवादीचे लक्ष्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागले आहे. ओबीसी मतांची बिदगी पदरात पाडण्यासाठी खरंतर भाजपने अगोदरच डाव टाकला. गोव्यातील ओबीसी संमेलनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक साद घातली. दुसरीकडे मराठा -ओबीसी एकीची साद जरांगे पाटील घालत आहेत. त्यातच मराठा मतांची बेरीज करत ओबीसी मतांचा गुणाकार करण्याची खेळी शरद पवार यांनी आखली आहे. भाजपच्या गडात जाऊन त्यांनी पहिली चाल खेळली सुद्धा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूरमध्ये आहे. तर मुख्यमंत्री सुद्धा याच गावचे. आता याच ठिकाणी मंडल यात्रेचा श्रीगणेशा करत पवारांनी थेट इशारा दिला.
V.P. चें कार्ड राज्याच्या राजकारणात
आज 9 ऑगस्ट, क्रांती दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मंडल यात्रेचे रणशिंग फुंकले. ही यात्रा नागपूरपासून सुरू झाली. ती राज्यातील कानकोपऱ्यात जाईल. मंडल यात्रा 52 दिवसांचीआहे. प्रत्येक जिल्हात आणि प्रत्येक तालुक्यात ती जाईल. ओबीसींना आपल्याकडे वळवण्याचे काम राष्ट्रवादी करेल.
या मंडल यात्रेला शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांची आठवण आली. व्हीपींनीच मंडल आयोगाची घोषणा केली होती. त्याला आता बरीच वर्ष लोटली. मंडल आयोगाला घटनात्मक दर्जा पण मिळाला. त्यावेळी राज्यात शरद पवार हे मुख्यमंत्री होते. त्यांनी या आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू केल्या होत्या. त्यातूनच मग ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मंडलच्या शिफारशी लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते आणि त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते हा निव्वळ योगायोग नक्कीच नव्हता, हे आताच्या तरुण ओबीसी वर्गाला कितपत माहिती आहे याची चाचपणी बहुधा या यात्रेतून करण्यात येईलच, नाही का?
मंडल यात्रा कशासाठी?
मंडल यात्रेचा उद्देश तर या विवेचनावरून लक्षात आलाच असेल. तर शरद पवार यांनी ओबीसी समाजासाठी जे योगदान दिले. ते जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी मंडल यात्रा हाती घेण्यात आली आहे. जेव्हा मंडल आयोग लागू करण्यात आला होता. तेव्हा कमंडल यात्रा कोणी काढली होती, याची आठवण आताच्या मंडल यात्रेतून करून देण्यात येणार हे वेगळं सांगायला नको. सध्या दिल्लीत महाराष्ट्राची चर्चा सुरू आहे. दिल्लीच्या सिंहासनाला महाराष्ट्रातून हादरे बसत आहेत, हे ही वेगळं सांगायला नको. त्यात ही मंडल यात्रा पुढील कडी म्हणताच येईल. तुम्हाला काय वाटतं?
शिव,शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार
नागपूर येथून मंडल यात्रेचा श्रीगणेश होत आहे. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. शिव शाहू आंबेडकरांचा विचार शरद पवार हे पुढे घेऊन जात आहेत,माणुसकी जपण्यासाठी आपल्या प्रयत्न करायचे आहे. ब्रिटिशकाळात आपल्या देशाला विभागले गेले होते,त्याचा फायदा घेऊन आपल्या देशावर राज्य केलं,त्याच प्रमाणे सरकार जाती-जातीत वाद निर्माण करतात. मुंबईत निवडणूकीसाठी वाद निर्माण केले जातात. महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण केले जात आहेत. जाती- धर्मात वाद निर्माण केले जात आहे, असे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
एका वर्षात सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ज्यावेळी नुकसान होत त्यावेळी जात पात धर्म बघितला जातो का, मुख्य मुद्यावर सरकार बोलत नाही. दिवसाला ८ शेतकरी करत आहेत,तरुणांच्या हाताला नोकरी नाही,देशात दिवसाला ७ तरुण आत्महत्या करत आहेत. प्रत्येक समाजातील महिलांवर अत्याचार होत आहेत,त्यावर बोलायला सरकार तयार नाही, असा घणाघात त्यांनी यावेळी घातला.
त्यांना मनुवाद आणायचाय
आम्ही देखील हिंदू संस्कृती जपणारे लोक आहोत. आधी हिंदू नंतर सनातन आता हे मनुवादाकडे जाणारे लोक आहेत. त्यांना मनुवाद आणायचा आहे. हे जातीवादाकडे जात आहेत ज्यांनी मंडल आयोगाच्या विरोधात कमंडल यात्रा काढली ते आज ओबीसीचे कैवारी आहेत असा आव आणत आहे, असा टोला पवारांनी लगावला.
शरद पवार यांनी देशात महिला धोरण आणले, कोणताही भेदभाव केला नाही. महिलांना न्याय दिला, सर्वाधिक एमआयडीसी शरद पवार यांनी आणल्या, त्यात नोकरी देताना जात विचारली नाही. 2014 नंतर नागपुरात किती नवीन कंपन्या आल्यात का की गेल्या गुजरातला, असा सवाल त्यांनी केला. बीड मध्ये महादेव मुंडेची हत्या झाली, त्यांची पत्नी अनेक महिने लढा देत आहे,का महादेव मुंडे यांना न्याय मिळाला नाही, 18 महिन्यांनी मुख्यमंत्र्यांना जाग आली, महादेव मुंडे, संतोष देशमुख हिंदू नव्हते का, असा जाब त्यांनी विचारला.
लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांचे नाव वगळण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीनंतर ही योजना बंद केली जाईल. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणाले होते,का केली नाही, 31 हजार कोटी थकले आहेत, 29 पर्यत कर्जमाफी केली नाही. रोज 8 आत्महत्या होत आहेत. 29 पर्यत 12 हजार गेले असतील याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील. ओबीसी समाजसाठी महामंडळ सुरू केलेत पण निधी देत नाही, या मुद्यावर त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
राज्याच्या कानाकोपऱ्यात मंडल यात्रा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मंडल यात्रेविषयी माहिती दिली. ही यात्रा 52 दिवसांची आहे. ती प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात जाईल. मी आणि रोहित महाराष्ट्राचा दौरा सुरू केला, त्यावेळी नाशिकच्या लोकांनी सांगितले की नेते गेले पण सामान्य कार्यकर्ते सोबत आहेत. कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय शरद पवार यांनी घेतला,पण हे सरकार सत्तेच्या समीकरणासाठी जाती आणि धर्मात वाद पेटवला. आरक्षण द्यायचे असेल तर कुणाच्या आरक्षणस हात ना लावता दयायची गरज आहे पण आद्यप आरक्षण मिळाले नाही. दीड हजार रुपये बहिणींना उपकार केले नाही पण ३३ टक्के आरक्षण शरद पवार यांनी दिला. सरकार बद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी उभ राहावं, असे ते म्हणाले.