बुमरा असताना अन् नसताना....
esakal August 10, 2025 10:45 AM

शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com

ओव्हल येथे झालेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात सिराजच्या गोलंदाजीला तोडच नव्हती. त्याक्षणी तो क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम गोलंदाज होता. त्याचे श्रेय त्याला द्यायलाच हवे आणि तेवढेच कौतुकही करायला हवे. ओव्हलमधील या कसोटीत बुमरा खेळणार नसल्यामुळे सर्व जबाबदारी आपल्यालाच पार पाडायची आहे, हे त्याच्या डोक्यात पक्के होते आणि त्याप्रमाणे तो लढला आणि ही मालिका त्याने अजरामर केली.

घरातील कर्ता काही कारणास्तव आणि ठरावीक काळासाठी घराची जबाबदारी सांभाळू शकत नसेल, तर त्याच्यानंतरच्या व्यक्तीने सर्व डोलारा सांभाळावा आणि त्या काळापुरती जबाबदारी पूर्ण करावी. यामध्ये त्या दुसऱ्या व्यक्तीचे कौतुक करावे तेवढे कमी असते. अशा प्रकारे जबाबदारी सांभाळतच कधीतरी तोही नंतरचा कर्ता होत असतो; पण याचा अर्थ मूळ कर्ता याचे महत्त्व कमी होत नसते. त्याची महती कायम राहते.

आता दुसऱ्या अर्थी विचार करूया. घराची जबाबदारी एकानेच घेण्यापेक्षा या दोघांनी एकत्रितपणे तेवढ्याच जोरदारपणे सांभाळली, तर घराची श्रीमंती किती पटीने वाढेल? जसप्रीत बुमरा हा भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीच्या घरकुलाचा कर्ता आणि मोहम्मद सिराज हा त्याचा शिष्यासारखाच. बुमराची ख्याती आणि दरारा केवळ भारतातच नव्हे, तर क्रिकेट विश्वात पसरलेली. भल्याभल्या फलंदाजांचे पाय बुमराचा सामना करताना लटपटतात. तोफखानाच जणू काही! हे क्षेपणास्त्र भात्यात असताना प्रत्येक मोहीम फत्तेच व्हायला हवी; पण कधी कधी आकडेवारी वेगळेच चित्र दर्शवत असते. आता हेच पाहा ना, बहुचर्चित इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटीत भारताने दोन विजय मिळवले; पण विजय मिळवलेल्या या कसोटींत बुमरा खेळला नव्हता. इतकेच नव्हे तर गेल्या अनेक कसोटींची आकडेवारी पाहिली, तर बुमरा न खेळलेले अनेक कसोटी सामने भारताने जिंकलेले आहेत. शेवटी म्हणतात ना, अभ्यास तासनतास केला, घोकमपट्टी केली तरीही परीक्षेत चांगले मार्क मिळाले नाहीत; पण मोजकाच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने वरचा क्रमांक मिळवला, तर उदोउदो चांगले मार्क मिळवणाऱ्या याच विद्यार्थ्याचा होत असतो. तसेच जणू काही सध्या झाले आहे. मोहम्मद सिराजला कोठे ठेवू कोठे नाही, असे झाले आहे.

ओव्हल येथे झालेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात सिराजने हार्ट आऊट इंग्रजीतील उक्तीप्रमाणे केलेली गोलंदाजी याला तोडच नव्हती. त्याक्षणी तो क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम गोलंदाज होता. त्याचे श्रेय द्यायलाच हवे आणि तेवढेच कौतुकही करायला हवे. ओव्हलमधील या कसोटीत बुमरा खेळणार नसल्यामुळे सर्व जबाबदारी आपल्यालाच पार पाडायची आहे, हे त्याच्या डोक्यात पक्के होते आणि त्याप्रमाणे तो लढला आणि ही मालिका त्याने अजरामर करत आपल्या नावावर नोंदवली; पण याच कसोटीत आदल्या दिवशी हॅरी ब्रुकचा सीमारेषेवर झेल पकडल्यावर सिरजचा पाय सीमारेषेला लागला आणि तो षटकार ठरला, तसेच त्याला जीवदानही मिळाले त्या वेळी ब्रुक १९ धावांवर होता. त्यानंतर त्याने १११ धावा केल्या. समजा हा कसोटी सामना आपण जिंकू शकलो नसतो, तर याच सिराजला व्हिलन ठरवण्यात आले असते.

इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. इंग्लंडने ३७३ धावांचे आव्हान सहज पार केले होते. यात दोन बाद २०६ अशी मजल त्यांनी मारली होती. त्या सामन्यात बुमरा आणि सिराज दोघेही खेळले; पण दोघांनाही दुसऱ्या डावात विकेट मिळाली नव्हती. त्यामुळे पाचव्या सामन्यातील सनसनाटी विजयाकडे पाहिले जाते तेव्हा या पहिल्या सामन्याचाही विचार व्हायला हवा. मुळातच आपल्याकडे विश्वात दरारा निर्माण करणाऱ्या वेगवान गोलंदाजांची वानवा आहे.

रमाकांत देसाई, त्यानंतर कपिल देव, पुढे झहीर खान आणि आता बुमरा असे मोजकेच महान वेगवान गोलंदाज तयार झाले. ऑस्ट्रेलियाच्या आत्ताच्या वेगवान गोलंदाजीचा विचार करतो तेव्हा, मिचेल स्टार्क, पॅट कमिंस आणि जॉश हेझलवूड असे तिघे तिघे एकत्रितपणे हल्लाबोल करतात; पण हे तिघेही खेळत असताना ऑस्ट्रेलियाला जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी अजिंक्यपद सामन्यात हार स्वीकारावी लागलीच होती. आता परिस्थिती बदललीय. भरगच्च आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि आयपीएलसारखी लीग यामुळे कार्यभाराचा अधिक ताण वेगवान गोलंदाजांवर येतो. बुमरा आणि सिराज दोघेही समान ३१ वर्षांचे आहेत; पण प्रामुख्याने गोलंदाजीच्या शैलीमुळे दुखापती होत असतात. बुमराचे तसेच झाले आहे.

असो... इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेचे विविध पैलू तपासले जात आहेत, त्या वेळी बुमराशिवाय आपण कसोटी सामने जिंकू शकतो, हे कोठेतरी चर्चिले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून बुमरा आणि त्याची तंदुरुस्ती व उपलब्धता किंवा निवडक सामने खेळण्याचा प्रकार यावर तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या इंग्लंड दौऱ्यात आपण कोणते तीन सामने खेळायचे, हे बुमराने स्वतःहून ठरवले, हे कदाचित संघ व्यवस्थापनाला पटले नसेल. म्हणूनच की काय मालिका बरोबरीत सुटल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघात आता स्टार संस्कृतीला स्थान नसेल, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटी प्रकारातून निवृत्त झालेत. त्यामुळे स्टार संस्कृतीने तेथेच निरोप घेतलाय. राहिलाय फक्त बुमरा. त्यामुळे गंभीर यांचा रोख त्याच्याकडे होता, हे स्पष्ट होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सचिन तेंडुलकरनेही

परखड मत व्यक्त केले. इंग्लंडमध्ये बुमरा नसताना मिळवलेले दोन कसोटी विजय हे योगायोग

होते. त्यामुळे बुमराचे महत्त्व कमी होत नाही, असे सचिन म्हणाला.

कोणत्याही संघात स्टार संस्कृती म्हणजेच वरिष्ठ खेळाडूंची मर्जी असू नये. सांघिक खेळात मैदानात उतरल्यावर प्रत्येक खेळाडू समान पातळीवर असतो. शेवटी संघासाठी त्याक्षणी सर्वोत्तम कामगिरी करणारा स्टार खेळाडू असतो. बुमराच्या निमित्ताने साधलेला निशाणा विराट कोहली आणि रोहित शर्मा एकदिवसीय प्रकारात परततील तेव्हा तो त्यांच्यासाठीही असेल. त्यांना आता निवडक सामन्यांत खेळण्याचा पर्याय उपलब्ध नसेल. तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवडक सामने खेळायचे असतील, तर हाच नियम आयपीएलसाठीही लावा म्हणजे तुमच्यावर कोणी आक्षेप घेणार नाही, एवढं साधं सोपं गणित आहे हे.

इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे, पाच कसोटींची मालिका खेळताना वेगवान गोलंदाजांची तंदुरुस्ती आणि उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. बुमरा या पुढेही पाचही कसोटीसाठी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे सिराजच्या तंदुरुस्तीकडे लक्ष द्यायला हवे. त्याला पुरेशी विश्रांती देत खेळवायला हवे; पण हे दोघे जेव्हा एकत्रित खेळतील तेव्हा दोन्ही बाजूने क्षेपणास्त्राचा मारा व्हायला हवा. बुमरा नसताना आग ओकणारा सिराज बुमरासह खेळतानाही तसाच दिसायला हवा. तसे झाले तर कोणतीही मोहीम फत्ते झाल्याशिवाय राहणार नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.