खड्डे जैसे थे, त्यात धुळीची भर
नागरिकांना जडले श्वसनविषयक आजार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० ः कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यावर खड्डे जैसे थे असून, त्यात आता धुळीची भर पडली आहे. मागील सहा-सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने रस्त्यावरील धुळीचे प्रमाण वाढले असून, प्रवासी हैराण झाले आहेत. रस्त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील घरात धुळीचे लोट शिरत असल्याने स्थानिकांना घराच्या खिडक्या बंद ठेवाव्या लागत आहेत. या धुळीमुळे नागरिकांना श्वसनविषयक आजारांना सामोरे जावे लागत आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील डांबरी रस्त्यावर खड्डे पडून त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पालिका ठेकेदाराने खडी आणि सिमेंट मिश्रित पाणी टाकून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु सकाळी बुजवलेले हे खड्डे संध्याकाळपर्यंत वाहन वर्दळीमुळे उखडले जातात. यामुळे प्रवाशांना पुन्हा खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. अशातच आता रस्त्यावरील धुळीचा त्रास सुरू झाला आहे. ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने सिमेंट मिश्रित पाणी सुकून रस्त्यावर सिमेंट पसरत आहे आणि हे सिमेंट वाऱ्यामुळे प्रवाशांच्या नाका-तोंडात जात आहे, तर बारीक खडी रस्त्यावर पसरली असून, दुचाकीस्वार यावरून घसरून पडत आहेत. दरम्यान, धुळीच्या त्रासाने सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले आहे.
धुळीचे लोट
डोंबिवलीतील टिळक रस्ता, टिळक पुतळा ते चार रस्ता, ९० फुटी रस्ता, ठाकुर्ली चोळे गाव रस्ता, एमआयडीसी रोड, नांदिवली रोड, डीएनसी रोड, कल्याणमध्ये के. सी. गांधी शाळा ते शिवाजी चौक, काटेमानिवली, कोळसेवाडी, मानपाडा रस्ता, पत्रीपूल ते ९० फुटी रस्ता भागात सर्वाधिक धुळीचे लोट पसरत आहेत.
धूळशमन वाहनांची मागणी
पालिकेच्या ताफ्यात दोन धूळशमन वाहने आहेत. ती बाहेर काढून नागरिकांना होणाऱ्या धुळीचा त्रास कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.