जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याणात भव्य रॅली
esakal August 11, 2025 11:45 AM

जागतिक आदिवासीदिनानिमित्त कल्याणात भव्य रॅली
संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याणचे आयोजन
कल्याण, ता. १० (वार्ताहर) : आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख जगाला व्हावी आणि एकजुटीचे प्रदर्शन व्हावे, यासाठी शनिवारी (ता. ९) जागतिक आदिवासीदिनाचे औचित्य साधून कल्याणमध्ये रॅली काढण्यात आली. या रॅलीत पारंपारिक पेहराव परिधान करून नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या रॅलीत सुशिक्षित तरुणाईचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे दिसून आले.
आदिवासी क्रांतिकारांना आदरांजली वाहून रॅलीची सुरुवात पश्चिमेतील सुभाष मैदान येथून होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, पत्रीपूल, चक्की नाका, विजयनगर येथे समारोप झाला. रॅलीमध्ये आदिवासींची संस्कृती, आदिवासी नृत्य, आदिवासी गीते, पोवाडे, विविध वाद्य, वेशभूषा, पारंपरिक लोकनृत्याच्या माध्यमातून आदिवासी कलागुण पाहायला मिळाले. तसेच आदिवासी क्रांतिकारकांचे देखावे सादर करण्यात आले.
या रॅलीत संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याणचे अध्यक्ष प्रभुदास पंधरे, रामनाथ भोजने, भागजी भांगरे, भरत बुळे, भरतकुमार पाटील, सविता हिले, जयराम शिंदे, संजय ओंकारेश्वर, दिलीप वरकडे आदींसह पालिका अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्यासह हजारोंच्या संख्येने सर्व आदिवासी बांधव सहभागी झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.