83388
अधिकारी, कर्मचाऱ्यांशी ‘बंधुत्वाचे’ नाते
शिवसेनेचे ‘रक्षाबंधन’ः दोडामार्गात महिला कार्यकर्त्यांकडून कृतज्ञता
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १० : समाजातील दुष्कृत्यांपासून, दृष्ट प्रवृत्तींपासून आपले रक्षण करणारे पोलिस कर्मचारी, न्यायदाते तहसीलदार व सुरळीतपणे वाहतुकीची सेवा देणारे एसटी कर्मचारी हे कायम बंधुत्वाचे नाते निभावत असतात. त्यांच्या या कार्याला सलाम म्हणून तालुक्यातील शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी रक्षाबंधन दिनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून कृतज्ञता व्यक्त केली.
भाऊ व बहिणीच्या पवित्र नात्याची साक्ष देणारा रक्षाबंधन हा दिवस महत्त्वाचा मराठी सण आहे. असे अनेक भाऊ आहेत, जे समाजातील बहिणींच्या रक्षणासाठी आपले घरदार सोडून कर्तव्य बजावत असतात. त्यांच्यासाठी या दिनाचे औचित्य साधून दोडामार्ग शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी समाजाशी निगडीत असलेल्या व कोणत्या ना कोणत्या मार्गाने समाजातील महिलांचे रक्षण करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
मिठाई वाटप करून आपल्या रक्षणकर्त्यांना या गोड क्षणाची कायमस्वरुपी आठवण राहील, अशा शुभेच्छाही आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंधूंना दिल्या. यावेळी शिवसेना महिला तालुका प्रमुख चेतना गडेकर, महिला शहर प्रमुख शीतल हरमलकर, मणेरी विभाग प्रमुख गुणवंती गावडे, उपशहर प्रमुख रसिका गावडे तसेच संजीवनी गवस आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या सहभागी झाल्या. समाजाप्रती बांधिलकी राखत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे निभावणाऱ्या बंधूंना रक्षाबंधन करण्याचा महिलांनी घेतलेला हा वसा बंधुत्वाचा सामाजिक संदेश देत आहे. त्यांच्या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले केले. अशा उपक्रमांतून समाजातील ऋणानुबंध कायमस्वरुपी टिकून राहणार, असे मत व्यक्त केले जात आहे.