काटेवाडी, ता. १० : शेतकऱ्यांसाठी पिकांचे उत्पादन वाढवणारे आणि रोगांपासून संरक्षण देणारे बायोमिक्स हे नवे जैविक मिश्रण आता उपलब्ध झाले आहे. हे मिश्रण १२ उपयुक्त सूक्ष्मजिवांचे संशोधनात्मक संयोजन आहे. हळद, आले, मिरची, टोमॅटो, मोसंबी, डाळिंब, तूर, कांदा, केळी यासह अनेक पिकांसाठी हे मिश्रण फायदेशीर आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीअंतर्गत जैविक औषध संशोधन, निर्मिती प्रयोगशाळा व राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे या बायोमिक्सवर संशोधन झाले आहे. बायोमिक्सचा वापर केल्याने कंदकुज, मृदाजन्य रोग, सूत्रकृमी आणि पानांवरील करपा रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. यामुळे पिकांची चांगली वाढ होऊन अन्नद्रव्यांचा पुरवठा सुधारतो. विशेषतः हळद आणि आल्यासारख्या कंदवर्गीय पिकांमध्ये कंदांचा आकार, संख्या आणि व्यास वाढतो. याशिवाय, बायोमिक्समुळे पिके लवकर उगवतात आणि उत्पादनाचा दर्जा सुधारतो.
वापराची पद्धत
कंद प्रक्रिया : २०० मिली बायोमिक्स १० लीटर पाण्यात मिसळून कंद ३० ते ६० मिनिटे भिजवावेत. नंतर सावलीत वाळवून लागवडीसाठी वापरावेत.
विजोत्तेजन (बायो प्रायमिंग) : २ लीटर बायोमिक्स १०० लीटर पाण्यात मिसळून वेणे रात्रभर भिजवावेत आणि दुसऱ्या दिवशी वाळवून लागवड करावी.
आळवणी आणि फवारणी : २०० मिली बायोमिक्स १० लीटर पाण्यात मिसळून आळवणी किंवा १०० मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
एकरी प्रमाण : ५ लीटर बायोमिक्स २०० लीटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे वापरावे.
पिकांसाठी ठरणार फायदेशीर
हळद, आले, मोसंबी, संत्री, लिंबू, मिरची, वांगे, पपई, सोयाबीन, तूर, हरभरा, केळी, द्राक्षे यासह अनेक पिकांवर बायोमिक्स प्रभावी आहे.
काय काळजी घ्यावी
बायोमिक्स रासायनिक खतांसोबत मिसळू नये.
थंड आणि कोरड्या जागी साठवावे.
जमिनीत ३० टक्के ओलावा असावा.
बायोमिक्स वापरण्यापूर्वी आणि नंतर ४-५ दिवस रासायनिक खते किंवा कीटकनाशके वापरू नयेत.
बायोमिक्स वापराचे फायदे
कंद/बेणे प्रकिया आणि आळवणी केली असता पिकास कंदकुज व इतर मृदाजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.
विजोत्तेजन (Bio Primix) केल्यास सर्वसाधारण वेळेपेक्षा आले/हळद लवकर उगवण्यास मदत होते.
हुमणी, कंदमाशी, खोडकीड यासारख्या किडींपासून पिकांचे संरक्षण होते.
कंदवर्गीय पिकात कंदाचा आकार, संख्या, लांबी आणी व्यास यामध्ये लक्षणीय वाढ होते.
पिकात पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होऊन पिकास उपलब्ध अन्नद्रव्याचा उत्तम पुरवठा होतो.
जमिनीतील अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते.
पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत बायोमिक्सची फवारणी केल्यास पानावरील करपा रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
सूत्रकृमींपासून पिकांचे संरक्षण होते.
पिकांची उत्पादकता वाढून दर्जेदार उत्पादन मिळण्यात मदत होते.
बायोमिक्स हे १२ विविध सूक्ष्मजिवांचे मिश्रण आहे. बायोमिक्समध्ये कीड रोगांवर नियंत्रण ठेवणारे सूक्ष्मजीव तसेच पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे सूक्ष्मजीव आहेत. कंदवर्गीय पिकामध्ये हे बुरशीनाशक अतिशय फायदेशीर आहे. बाजारातील
रासायनिक बुरशीनाशकांवर १५ ते २० टक्के जास्त खर्च शेतकऱ्यांचा होत असतो. हे जैविक बायोमिक्स असल्याने हे वारंवार तुम्हांला पिकाला टाकण्याची गरज नाही. रासायनिक बुरशीनाशकांचा पावसाळ्यामध्ये जास्त परिणाम दिसून येत नाही.
- डॉ. डी. जी. हिंगोले, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, छत्रपती संभाजीनगर