पाकिस्तानचा आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीरने भारताला धमक्या देतानाच अनेक कट सत्यांचादेखील स्वीकार केला आहे. भारताबद्दल द्वेष उगाळताच त्याने असं काही वक्तव्य केलं, ज्याची सगळीकडे चर्चा आहे. असीम मुनीर याने भारताची तुलना हायवेवर वेगाने धावणाऱ्या चमकदार मर्सिडीज कारशी केली आहे, तर पाकिस्तानला त्यांनी भंगाराने भरलेला, कचरा वाहून नेणारा ट्रक म्हटलं. मात्र या दोन वाहनांची टक्कर झाली तर नुकसान कोणाचे होईल? असा सवाल विचारत त्यांनी एकाप्रकारे भारताला धमकी देखील दिली.
मुनीर याने अमेरिकेत हे विधान केले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर असीम मुनीरने आपला राग व्यक्त केला. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी बालिश धमकी दिली की जर भारतामुळे पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले तर पाकिस्तान त्याच्यासोबत अर्धं जग घेऊन बुडेल. असीम मुनीर याचं हे विधान म्हणजे पाकिस्तानने भारताविरुद्ध तिसऱ्या देशाला दिलेली पहिली धमकी आहे.
आसिम मुनीर हा अमेरिकेतील टाम्पा येथे एका ब्लॅक टाय डिनर पार्टीला उपस्थित होता. ही पार्टी पाकिस्तानी उद्योगपती अदनान असद यांनी आयोजित केली होती. अदनान असद हे टाम्पा येथे पाकिस्तानचे मानद कॉन्सुल आहेत.
10 मिसाईल्स करू फायर
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत कारवाई केली, मे महिन्यात झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर असीम मुनीर यांचा हा दुसरा पाकिस्तान दौरा आहे. पाकिस्तानमध्ये मुल्ला जनरल ही पदवी असलेले असीम मुनीर याने सिंधू पाणी करार स्थगित केल्याबद्दल भारताला धमकी दिली. द प्रिंट या इंग्रजी वेबसाइटने तिथे उपस्थित असलेल्या सूत्रांच्या आधारे माहिती दिली की, “असिम मुनीर म्हणाले – आम्ही भारत (नदीवर) धरण बांधण्याची वाट पाहू आणि जेव्हा भारत असे करेल तेव्हा आम्ही 10 मिसाइल्स (क्षेपणास्त्रं) डागू, सिंधू नदी ही भारताची कौटुंबिक मालमत्ता नाही, आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही.” अशी धमकीच त्यांनी दिली.
ब्लॅक टाय डिनर ही एक औपचारिक सोशल पार्टी असते. यामध्ये, यजमान पाहुण्यांनी ब्लॅक टाय ड्रेस कोडचे पालन करावे अशी अपेक्षा करतो. हा ड्रेस कोड उच्च पातळीची औपचारिकता दर्शवितो आणि सामान्यतः रात्रीच्या वेळी आयोजित केलेल्या खास प्रसंगी, जसे की गाला, पुरस्कार समारंभ, लग्न किंवा उच्च दर्जाच्या डिनर पार्टीमध्ये दिसून येतो.
या पार्टीमध्ये पुरुषांनी काळा टक्सिडो, पांढरा शर्ट, काळा बो टाय, काळा वेस्ट किंवा कमरबँड आणि पॉलिश केलेले फॉर्मल शूज घालणे अपेक्षित आहे. या पार्टीमध्ये आमंत्रित केलेल्या पाहुण्यांना मोबाईल फोन किंवा इतर डिजिटल उपकरणे आणण्याची परवानगी नव्हती. फ्लोरिडातील टाम्पा येथे आयोजित केलेल्या या रात्रीच्या जेवणाच्या प्रत्येक भागात भारताबद्दल द्वेष आणि धार्मिक कट्टरता होती.
फील्ड मार्शल मुनीर म्हणाला, “आपण भारताच्या पूर्वेकडून सुरुवात करू, जिथे त्यांनी त्यांचे सर्वात मौल्यवान संसाधने स्थापित केली आहेत आणि नंतर पश्चिमेच्या दिशेने वळू.” फील्ड मार्शल मुनीर याची प्रतिमा धार्मिक कट्टर जनरल अशी आहे. मुनीर हाँ पाकिस्तानचा पहिला आर्मी चीफ आहे, ज्याने मदरशातून शिक्षण घेतले आहे. असीम मुनीर हा त्याच्या युक्तिवादांना समर्थन देण्यासाठी अनेकदा धार्मिक उदाहरणं वापरतो.
भारत चमचमती मर्सिडीज, पाकिस्तान भंगाराचा ट्रक
पाकिस्तान हा भारताचे नुकसान कसे करु शकतो, हे सांगण्यासाठी आसिम मुनीरने एक उदाहरण दिलं. ज्यात त्याने भारताला एक चमचमती मर्सिडीज कार तर पाकिस्तानची तुलना भंगाराने भरलेल्या एका डंपिंग ट्रकशी केली. “परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी मी एक साधे उदाहरण देईन. भारत म्हणजे फेरारीप्रमाणे हायवेवरूनवेगाने धावणारी चमकणारी मर्सिडीज आहे, पण आपण (पाकिस्तान) कचरा, विटा आणि दगडांनी भरलेला डंप ट्रक आहोत. जर हा ट्रक त्या कारला धडकला तर नुकसान कोणाचे होईल?” असं फील्ड मार्शल मुनीर म्हणाला.
फील्ड मार्शल मुनीर याने या प्रसंगाचा फायदा घेऊन पाकिस्तानी राजकारणात आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत लष्कराच्या सहभागाचे समर्थन केले. मुनीर याने पाकिस्तानी मंत्री बाबर खान गौरी यांच्या विधानाचा उल्लेख करताना म्हटले की, ते म्हणतात की युद्ध इतके गंभीर आहे की ते सेनापतींवर सोडता येत नाही, परंतु राजकारणही इतके गंभीर आहे की ते राजकारण्यांवर सोडता येत नाही.