गाझा शहरात रविवारी इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर एअर स्ट्राइक केला. यामध्ये अल जझीरा माध्यम समूहाच्या पाच पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. यात अनस अल-शरीफ या प्रख्यात पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने हल्ल्याची पुष्टी केली आहे. “पत्रकारितेचा बुरखा पांघरुन अनस अल-शरीफ हमासचा एजंट बनून काम करत होता. रॉकेट हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी गटाचं तो नेतृत्व करत होता” असा आरोप इस्रायलने केला आहे. अली जझीराने इस्रायलच्या या कृत्याचा निषेध करताना ही ठरवून केलेली हत्या असल्याचं म्हटलं आहे. गाझामधून स्वतंत्रपणे चालणारं वार्तांकन दाबून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. गाझामध्ये जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय मीडियावर अनेक निर्बंध असल्याचही म्हटलं आहे. दोनवर्षांपूर्वी गाझा पट्टीत युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर अल जझीरा वाहिनीच्या पत्रकारांवर झालेला हा सर्वात भीषण हल्ला आहे. प्रेस फ्रिडम ग्रुपनुसार जवळपास 200 मीडिया कर्मचाऱ्यांचा गाझामध्ये वार्तांकन करताना मृत्यू झाला आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात आपल्या पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची अल जझीराने पुष्टी केलीय. यात मुख्य प्रतिनिधी अनस अल-शरीफ आहे. रिपोर्टर मोहम्मद, कॅमेरा ऑपरेटर इब्राहिम झाहर, मोहम्मद नौफल आणि मोअमेन अलिवा यांचा मृत्यू झाला आहे. अल-शिफा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर प्रेससाठी लावलेल्या एका तंबूत ते राहत होते. इस्रायलने या तंबूला टार्गेट करुन हल्ला केला.
IDF ने काय म्हटलय?
इस्रायल डिफेन्स फोर्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलय की, “हमासचा दहशतवादी अनस अल-शरीफ स्वत:ला अल जजीराचा पत्रकार सांगत होता. तो हमासच्या एका दहशतवादी गटाचा प्रमुख होता. त्याने इस्रायली नागरिक आणि IDF सैनिकांवर रॉकेट हल्ले केले होते”