नवा अध्याय लिहिण्याची महिला संघाकडे संधी
esakal August 10, 2025 10:45 AM

जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com

नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडमधील एकदिवसीय व टी-२० मालिकेत भारतीय महिला संघाने विजयाला गवसणी घालत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या वर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय आणि पुढल्या वर्षी जून-जुलै या कालावधीत टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय महिला संघाकडे या दोन्ही स्पर्धांचे अजिंक्यपद पटकावून नवा अध्याय लिहिण्याची संधी आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला कसोटी सामना बंगळूरमध्ये १९७६मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळला. सहा सामन्यांची ही मालिका १-१ अशा बरोबरीत राहिली. भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला एकदिवसीय सामना १९७८मध्ये कोलकातामध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला. या लढतीत भारतीय महिला संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला टी-२० सामना २००६मध्ये इंग्लंडविरुद्ध डर्बी येथे खेळला. या लढतीत भारतीय महिला क्रिकेट संघाने विजय साकारला. कसोटी, एकदिवसीय व टी-२० असे तिन्ही प्रकार वर्षानुवर्षे खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला अद्याप एकदिवसीय अन् टी-२० विश्वकरंडकाला गवसणी घालता आली नाही.

भारतीय महिला क्रिकेटला डायना एडुलजी, शुभांगी कुलकर्णी, शांता रंगास्वामी, अंजली पेंढारकर, अरुंधती घोष, आरती वैद्य, अंजुम चोप्रा, नीतू डेव्हिड, झुलन गोस्वामी, मिताली राज यांसारख्या खेळाडू लाभल्या आहेत. या यादीत आणखी काही नावे टाकता येतील. सध्याच्या भारतीय महिला संघामध्ये तर एकापेक्षा एक अशा दर्जेदार खेळाडू आहेत. स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, पूजा वस्त्रकार, राधा यादव, स्नेह राणा, रेणुका सिंग यांसारख्या स्टार खेळाडू भारतीय महिला संघाच्या सदस्या आहेत. शेफाली वर्मा, एस. सतीश, प्रतीका रावल, सजीवन सजना, श्रेयांका पाटील, आशा शोभना, साईका इशाक या खेळाडूंकडूनही मोठ्या आशा बाळगल्या जात आहेत.

भारतीय महिला संघाची एकदिवसीय विश्वकरंडकातील सर्वोत्तम कामगिरी २००५ व २०१७मध्ये झाली. या दोन्ही वर्षांमध्ये भारतीय महिला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारतीय महिला संघाची टी-२० विश्वकरंडकातील सर्वोत्तम कामगिरी २०२०मध्ये घडून आली. या वर्षीही भारतीय महिला संघ उपविजेता ठरला. २०२२मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने रौप्यपदकाची कमाई केली. २०२२मधील आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावण्यात त्यांना यश मिळाले. आशियाई करंडकाच्या जेतेपदावर सात वेळा नाव कोरण्यात भारतीय महिला संघाने यश संपादन केले. आशियाई करंडक व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कामगिरीची तुलना विश्वकरंडकातील प्रदर्शनाशी करू नये. विश्वकरंडकात जगातील सर्व अन् महत्त्वाचे बलाढ्य देश सहभागी होतात. त्यामुळे विश्वकरंडकात प्रत्येक देशातील खेळाडूंचा कस लागतो, म्हणूनच विश्वकरंडकाचे जेतेपद लाखमोलाचे असते.

असो, मिताली राज व झुलन गोस्वामी या भारताच्या दोन महान महिला क्रिकेटपटू म्हणून ओळखल्या जातात; मात्र विश्वविजेतेपदाची चव त्यांना काही चाखता आली नाही. याचे शल्य त्यांना नेहमी बोचत राहते. हरमनप्रीत, स्मृती या अनुभवी खेळाडूंनी आगामी काळात सहकाऱ्यांना हाताशी घेऊन एकदिवसीय व टी-२० विश्वकरंडक पटकावण्याचे स्वप्न साकार करावे, अशी अपेक्षा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या चाहत्यांची आहे. पूर्वी भारतामध्ये महिला क्रिकेटला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जात नव्हते.

सुविधांचाही अभाव होता. मानधनाची कमतरता होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवरही कपात केली जात होती; मात्र गेल्या काही वर्षांमध्ये महिला क्रिकेटमध्येही आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. भारतामध्येच नव्हे तर जागतिक स्तरावर हा बदल प्रकर्षाने दिसून येत आहे. पुरुष क्रिकेट संघाच्या ज्या स्पर्धा होतात, अगदी त्याच स्पर्धा महिला क्रिकेटच्या होताना दिसत आहे. एकदिवसीय विश्वकरंडक असो किंवा टी-२० विश्वकरंडक असो... आशियाई करंडक असो किंवा आशियाई क्रीडा स्पर्धा असो... प्रत्येक स्पर्धांमध्ये पुरुषांसोबत महिलांनाही प्राधान्य देण्यात येत आहे. पुढे जाऊन आता २०२८मध्ये लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्येही क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयकडून दरवर्षी करारबद्ध खेळाडूंची श्रेणी जाहीर करण्यात येते. यामध्ये खेळाडूंची श्रेणीनुसार विभागणी केली जाते व त्यानुसार वर्षाचे मानधन देण्यात येते. हाच धागा पकडत बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंसाठीही अशा पद्धतीची करारबद्ध श्रेणी सुरू केली आहे. पुरुषांएवढ्या रकमेचा करार नसला तरी महिला क्रिकेटपटूंवरही चांगल्या प्रमाणात धनवर्षाव करण्यात येतो. आगामी काळात यामध्ये वाढही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नव्हे तर भारतीय महिला संघ आता नित्यनियमाने परदेश दौऱ्यावर जात आहे. परदेशातील खेळपट्टी व वातावरणाचा त्यांना अभ्यास करता येत आहे.

भारतामधील महिलांच्या स्थानिक स्पर्धाही वाढवण्यात आल्या आहेत. महिला प्रीमियर लीग, महाराष्ट्र प्रीमियर लीग यांसारख्या स्पर्धा महिला क्रिकेटसाठी प्रोत्साहन देणाऱ्या ठरताहेत. महिला प्रीमियर लीगमध्ये परदेशी खेळाडूंचा समावेश असल्यामुळे भारतातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव लहान वयामध्ये मिळत आहे. हेही नसे थोडके. भारतीय महिला संघाला मार्गदर्शन करण्यासाठी अमोल मुजुमदारसारखे अनुभवी प्रशिक्षक कार्यरत आहेत. त्यांना सहाय्यक प्रशिक्षकांची साथ मिळत आहे. भारतामध्ये सरावासाठी अत्याधुनिक दर्जाची स्टेडियम्सही उपलब्ध आहेत. एकूणच काय तर सध्याच्या घडीला भारतीय महिला संघाला कशाचीही कमतरता नाही.

यंदा अर्थातच या वर्षी भारत व श्रीलंका येथे होत असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक आपल्या महिला संघासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकणार आहे. मायदेशात खेळताना आपल्या क्रिकेटप्रेमींसमोर भारतीय महिला संघाला जिंकण्याची प्रेरणा मिळू शकणार आहे. भारतरत्न, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न भारतातील मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर पूर्ण झाले. याचीच पुनरावृत्ती भारतीय महिला संघाला करता येऊ शकणार आहे. पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदाची स्वप्नपूर्ती भारतामध्ये करण्याची किमया त्यांना करता येणार आहे. यानंतर पुढल्या वर्षी इंग्लंडमध्ये टी-२० विश्वकरंडकाचा थरार रंगणार आहे.

भारतीय महिला संघाने या वर्षी इंग्लंडमध्ये एकदिवसीय व टी-२० मालिका जिंकताना संस्मरणीय कामगिरी करून दाखवली. तेथील वातावरण व खेळपट्टीचा रागरंग भारतीय महिला खेळाडूंना समजलाय. याचा फायदा त्यांना पुढल्या वर्षी घेता येऊ शकणार आहे. महिला क्रिकेट संघाने विश्वकरंडक उंचावण्याचे स्वप्न तमाम क्रिकेटप्रेमी पाहत आहेत. याच पाश्वर्भूमीवर भारतीय महिला संघासाठी सप्टेंबर २०२५ ते जुलै २०२६ हा काळ लाखमोलाचा ठरू शकणार आहे. भारतीय महिला संघाला मनापासून शुभेच्छा!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.