श्रीवर्धन, ता. ९ (वार्ताहर)ः नारळी पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात उत्साहाला उधाण आले होते. श्रीवर्धन येथे यंदाही नारळफोडीचे खेळ पार पडले. या वेळी खेळाडूंच्या उत्साहाला किनाऱ्यावर उधाण आले होते.
कोळीबांधवांसाठी नारळी पौर्णिमेचे आगळेवेगळे महत्त्व आहे, पण हा सण श्रीवर्धनकरांसाठीदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. कारण या सणानिमित्त समुद्रकिनाऱ्यांवर होणारे नारळफोडीचे खेळ आकर्षण राहते. खेळासाठी वापरण्यात येणाऱ्या नारळाची किंमत ही पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत असते. खेळासाठी जो नारळ वापरला जातो, त्या नारळाची करवंटी जाड असते. झाड बाजण्यासाठी काही वर्षांचा कालावधी जातो. नारळाचे झाड बाजायला लागले की जास्त प्रमाणात पाणी घातले जात नाही. या कालावधीत माड हा करळावर (एक प्रकारचे खत) वाढवला जातो. यामुळे फळधारणा कमी होते, परंतु नारळाची करवंटी जाड होते.
--------------------------
फुटलेल्या नारळाचा प्रसाद
नारळाचे चोड व शेंडी काढून गोटा केलेला नारळ मैदानात खेळासाठी वापरला जातो. खेळाडूंमध्ये वीस फुटांचे अंतर असते. समोरचा स्पर्धक जमिनीवरून सरपटत आलेला नारळ हातातील नारळाने फोडतो. त्यानंतर हा नारळ प्रेक्षकांना प्रसाद म्हणून दिला जातो.