पर्यावरणपूरक मखरांना ग्राहकांची पसंती
दादरमध्ये दुकाने सजली
प्रभादेवी, ता. ११ (बातमीदार) : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नाना तऱ्हेची डोळे दिपतील, अशी आकर्षक मखर दादरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आली असून, पर्यावरणपूरक मखरांना ग्राहकांची जास्त पसंती मिळत आहे.
दादर येथील बाजारपेठेत सनबोर्ड, लाकूड, फोम, कपडा, आरसा, चटई, रबर शीट, कृत्रिम फुले यांचा वापर करून सुंदर कलाकृतीतून साकारलेले पर्यावरणपूरक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. सध्या सर्वाधिक चालणारा वॉटर फॉल देखावा असलेल्या मखरांची सर्वाधिक विक्री होत असल्याचे हरदेव आर्टचे मालक रुणा दबडे यांनी सांगितले.
नंदीच्या मुखातून पडणारे पाणी, पिलर मध्ये दाखविण्यात आलेले वॉटर फॉल, लाइट ऑन ऑफ होताना दिसणारे मॅजिक ओम अशी सुंदर कलाकृती असलेले मखर या प्रदर्शनातून पाहायला मिळतात, तर बालाजी मंदिर, दीपमाळ मंदिर, शिश महल, मोर आसन, मीनाक्षी टेम्पल, गोल घुमट, प्राचीन टेम्पल, अष्ट विनायक मंदिर, लालबागचा राजा मखर, छावा मखर अशी सुंदर कलाकृती असलेले मखर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
२५ हजारांपर्यंत दर
सजावटीसाठी एक फुटापासून ते ३.५ फुटांपर्यंतच्या मूर्तिसाठीचे देखावे मखर १२०० पासून ते २५ हजारांपर्यंत मिळत असल्याचे रुणा यांनी सांगितले. गणपती सजावटीसाठी लागणारी विविध प्रकारची कृत्रिम फुले, आकर्षित करणारी फुलांची तोरणे, माळा, फ्लॉवर स्टँड, देखावे, मखर एकाच ठिकाणी मिळत असल्याने खरेदीसाठी दादरमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.